Early morning clash : भरधाव इको कार आणि ट्रकमधील समोरासमोरच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे घडली. अहिल्यानगर–दौंड राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव शिवारात, माऊली मंदिराजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मृतक अकोला जिल्ह्यातील मळसुरचे; १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी
राहुल सोनोने
अहिल्यानगर/दिग्रस बु. : भरधाव इको कार आणि ट्रकमधील समोरासमोरच्या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी पहाटे घडली. अहिल्यानगर–दौंड राष्ट्रीय महामार्गावरील कोळगाव शिवारात, माऊली मंदिराजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत १३ वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार ; सिंदखेड राजा टी-पॉईंटवरील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास इको कार आणि दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात इको कारचा चालक नितीन अनिल कोकाटे (२२, रा. काष्टी) यांच्यासह गजानन जनार्धन पायघन (४७), दुर्पा गजानन पायघन (३६) आणि त्यांचा मुलगा वैभव गजानन पायघन (१९) यांचा जागीच मृत्यू झाला. कुटुंबातील करण गजानन पायघन (१३) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला जिल्ह्यावर शोककळा
पायघन कुटुंब मूळचे मळसुर (ता. पातूर, जि. अकोला) येथील आहे. रोजगारानिमित्त ते सध्या श्रीगोंदा तालुक्यातील चिंभळे येथे वास्तव्यास होते. गावाहून चिंभळेकडे परतत असताना कोळगाव शिवारात त्यांच्या वाहनाला अपघात झाला.
घटनेची माहिती मिळताच बेलवंडी पोलीस ठाणे येथील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती.
महामार्ग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे मळसुर व चिंभळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणात कुटुंबाचा आधारवड हरपल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. भल्या पहाटे घडलेल्या या भीषण अपघाताने पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गांवरील वेगमर्यादा, बेदरकार वाहनचालक आणि अपुरी सुरक्षाव्यवस्था याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

