Latamandap festival : प्रतितिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी महाराजांचा आगळावेगळा आणि केवळ देऊळगाव राजा शहरात पार पडणारा लाटामंडप उत्सव यावर्षीही भक्तांच्या असीम उत्साहात आणि श्रींच्या जयघोषात संपन्न झाला. या उत्सवाला सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांचा उत्साह दुणावला.

आमदार मनोज कायंदे यांची उपस्थिती; भाविकांचा वाढला उत्साह
गजानन तिडके
देऊळगाव राजा : प्रतितिरुपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी महाराजांचा आगळावेगळा आणि केवळ देऊळगाव राजा शहरात पार पडणारा लाटामंडप उत्सव यावर्षीही भक्तांच्या असीम उत्साहात आणि श्रींच्या जयघोषात संपन्न झाला.
या उत्सवाला सिंदखेड राजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांचा उत्साह दुणावला. मंदिर परिसरात घंटानाद, नगारे, “गोविंदा-गोविंदा”चा उदघोष, “बोल बालासाहेब की जय” आणि “लक्ष्मी रमण गोविंदा”च्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
मानकरी आणि भाविकांनी अवघ्या साडेतीन तासांत ४२ मंडपाला दोर बांधून दीड फूट व्यास व ३२ फूट उंचीच्या २१ महाकाय सागवानी लाटा उभारल्या. महाद्वाराशेजारील हनुमानाची प्राचीन दगडी मूर्ती व संस्थानसमोरील गरुडाची दगडी मूर्ती यांना अखंड दोर बांधून हा महाकाय लाटामंडप उभारण्यात आला.
या कार्यासाठी मानकऱ्यांसह सर्व समाजबांधवांनी उत्साहाने सहकार्य केले. लाटामंडप उभारणीनंतर सर्व मानकऱ्यांना श्री बालाजी संस्थानच्या वतीने प्रसाद वितरित करण्यात आला.

आमदार मनोज कायंदे यांची उत्साही उपस्थिती
३० सप्टेंबर राेजी सायंकाळी झालेल्या मंडप उत्सवात आमदार कायंदे स्वतः उपस्थित राहिले. “संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांतून श्रींच्या उत्सवाला भाविक येतात. या भाविकांचा सन्मान व सोयीसुविधांची जबाबदारी आपली आहे,” असे आमदार कायंदे यांनी यावेळी सांगितले. त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, विजय वाघ, सदाशिव मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
१० ऑक्टाेबर राेजी लळितोत्सव
श्री बालाजी संस्थानच्या वतीने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार आश्विन शु. ९-१० (बुधवार, १ ऑक्टोबर मध्यरात्रीपासून गुरुवार, २ ऑक्टोबर सायंकाळपर्यंत) श्रींची पालखी मिरवणूक होणार आहे. आश्विन कृ. ४ (शुक्रवार, १० ऑक्टोबर) : सूर्योदयास ५:४५ वा. लळितोत्सव संपन्न हाेणार आहे. भाविकांनी दर्शन, प्रसाद व यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे वंशपरंपरागत विश्वस्त राजे विजयसिंह जाधव व व्यवस्थापक किशोर बीडकर यांनी केले आहे.
भाविकांसाठी आधुनिक सुविधा
भाविकांना सहजतेने देणगी देता यावी, यासाठी कानगी व शाश्वत अन्नदानासाठी दोन स्वतंत्र क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांनी या क्यूआर कोडचा वापर करून देणगी जमा करावी, असेही संस्थानच्या वतीने कळविण्यात आले आहे.

