Patur taluka: खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व कापूस या पिकांवर यंदा निसर्गाने कहर केला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिके हातातून जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुसळधार पावसाने तालुका ओल्या दुष्काळाच्या कवेत गेला आहे.

संजय गोतरकर
पातूर : खरीप हंगामातील सोयाबीन, तूर व कापूस या पिकांवर यंदा निसर्गाने कहर केला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पिके हातातून जाण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. मुसळधार पावसाने तालुका ओल्या दुष्काळाच्या कवेत गेला आहे.
कपाशीपेक्षा नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीनला प्राधान्य दिले होते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे बळीराजाचे तोंडचे पाणी पळाले आहे. शेंगा भरल्याऐवजी पापड्यासारख्या झाल्या असून अनेक शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उभ्या सोयाबीनच्या शेंगा काळवंडल्या असून कपाशीचीही हानी होत आहे.शेतकरी एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी संकटाचा सामना करीत आहे. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

संपूर्ण तालुकाच दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी
संपूर्ण पातुर तालुकाच ओला दुष्काळ ग्रस्त म्हणून शासनाने जाहीर करावा. संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढवले असून सोयाबीन, कापूस, मूग , उडीद,फुलशेती, भाजीपाला, संत्रा मोसंबी, खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाण नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला शासनाने भरीव मदत देऊन आत्महत्या सारखे पाऊल उचलण्यापासून शासनाने शेतकऱ्याला थांबविण्याची गरज आहे.
“मागील काही दिवसांपासून शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. तुरीच्या उभ्या पिकालाही उदयी लागून ती जळत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी.”चंद्रकांत अंधारे (जिल्हाध्यक्ष, किसान आघाडी, भाजप)
“शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी.”हिदायत खान रूम खान (माजी नगराध्यक्ष, पातूर)
“गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यात हाहाकार माजला आहे. अनेक शेतात पावसाचे पाणी साचल्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी यासारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने तुटपुंजी मदत न देता भरीव मदत करावी.”कृष्णा अंधारे (माजी जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – अजित पवार गट, अकोला)

