Jagadamba Mata : जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेले दाभा हे छोटेसे गाव. परंतु या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदैवत आई जगदंबा माता. गावाच्या उत्तरेस वसलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांचा जनसागर ओसंडून वाहतो. श्रद्धा, भक्ती व आनंदाचा संगम घडवणारा हा उत्सव दाभा ग्रामस्थांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पर्व मानला जातो.

लोणार : जगप्रसिद्ध लोणार सरोवरापासून अवघ्या १५ किमी अंतरावर वसलेले दाभा हे छोटेसे गाव. परंतु या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामदैवत आई जगदंबा माता. गावाच्या उत्तरेस वसलेल्या या मंदिरात नवरात्रोत्सवात भाविकांचा जनसागर ओसंडून वाहतो. श्रद्धा, भक्ती व आनंदाचा संगम घडवणारा हा उत्सव दाभा ग्रामस्थांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा पर्व मानला जातो.
पहाटेपासूनच भक्तांची पावले मंदिराकडे वळतात. सकाळी चार वाजल्यापासूनच दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी वाढू लागते. जगदंबेचा जागर सुरू होताच गावातील प्रत्येक रस्ता भक्तिमय वातावरणाने उजळतो. मंदिराकडे जाणारा रस्ता भाविकांच्या रांगेने गजबजतो. नवरात्राच्या प्रत्येक दिवशी गावात उत्सवाचे स्वरूप लाभते.
गावातील सर्व ग्रामस्थ श्रावण महिन्याच्या प्रारंभापासून विजयादशमीपर्यंत मासांहार वर्ज करून विशेष उपासना करतात. ही परंपरा आजही अबाधितपणे सुरू आहे. श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे हे उदाहरण इतरत्र क्वचितच पहायला मिळते.
१७ वर्षांची स्वच्छता परंपरा
आई जगदंबेच्या उत्सवात गेली १७ वर्षे एक वेगळीच परंपरा जोपासली जाते. गावातील प्रतिष्ठित व्यापारी सुरेश मोरे हे पहाटे हातात खराटा घेऊन मंदिर रस्ता व परिसर स्वच्छ करतात. प्रथम त्यांनी हे कार्य एकटे सुरू केले, परंतु त्यांच्या या उपक्रमाने प्रभावित होऊन आता गावातील तरुण आणि लहान मुलेही स्वच्छता सेवेत सहभागी होतात. यामुळे मंदिर परिसर दररोज झळाळून निघतो आणि भाविकांना स्वच्छ वातावरणात दर्शनाचा लाभ मिळतो.
भक्तीमय वातावरणाचा उत्साह
नवरात्राच्या पहिल्या माळेपासूनच दाभा येथे भक्तीचा सागर वाहू लागतो. मंदिरात दर्शनासाठी रांगा लागतात. रोषणाईने सजलेले मंदिर, ढोल-ताशांचा गजर, देवीचे जयघोष यामुळे भक्तीचे वातावरण अधिक दुणावते. महिलांची खास उपस्थिती आणि पारंपरिक वेशभूषेतील तरुण यामुळे नवरात्राचा माहोल अधिक रंगतदार होतो.
गावातील स्वयंसेवक भक्तांच्या सेवेत तत्पर असतात. वाहतुकीची व्यवस्था, प्रसाद वाटप, स्वच्छता आणि रांग व्यवस्थापन आदी जबाबदाऱ्या ते मनापासून पार पाडतात. प्रत्येक भक्ताला समाधानाने दर्शन व्हावे, यासाठी ग्रामस्थ नेहमीच प्रयत्नशील असतात.
श्रद्धा व परंपरेचे दर्शन
आई जगदंबा ही गावकऱ्यांची केवळ ग्रामदैवत नसून त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. आई जगदंबेचा महिमा आणि भक्तांची अपार श्रद्धा या उत्सवात प्रकर्षाने दिसते. श्रद्धेने नतमस्तक होणारा भाविक असो किंवा सेवा कार्यात स्वतःला झोकून देणारा स्वयंसेवक – प्रत्येकासाठी हा उत्सव आयुष्यभर लक्षात राहणारा ठरतो.
जागृत स्थानाची परंपरा
दाभा येथील आई जगदंबा माता हे एक जागृत ठिकाण मानले जाते. चैत्र पौर्णिमा आणि नवरात्र या दोन पर्वांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरे होतात. भाविकांच्या नवसाला माता नेहमीच पावते, असा अनुभव भक्तांना आलेला आहे. त्यामुळेच येथे नवरात्रात लाखो भाविक दर्शनासाठी दाखल होतात.नवरात्रातील नऊ दिवस ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसरात चहा व फराळ प्रसाद वाटपाची व्यवस्था केली जाते, तर विजयादशमीच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन होते.

