14 Ambulances Grounded :केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच १०२ रुग्णवाहिका सेवेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.

१०२ रुग्णवाहिका सेवा ठप्प; गर्भवती महिला, अपघातग्रस्त आणि बालकांचे हाल
गजानन तिडके
देऊळगाव राजा: जिल्ह्यात १०२ रुग्णवाहिका सेवेबाबत गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून, रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रेय बिराजदार यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका सेवेतील तब्बल १४ रुग्णवाहिका गेल्या सात ते आठ महिन्यांपासून चालकांच्या अभावामुळे बंद आहेत. प्रशासकीय मान्यता नसल्याचे कारण देत ही सेवा बंद ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी सिव्हिल सर्जन कार्यालयाकडून दिरंगाई होत असल्याचेही सांगण्यात आले. रुग्णवाहिका बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फटका बसत आहे. गर्भवती महिला, विषबाधित रुग्ण, अपघातग्रस्त तसेच नवजात बालकांना वेळेवर उपचारासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या वाढत्या उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाचा जीव जाण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.
वाहन चालकांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, प्रशासकीय मान्यता मिळेपर्यंत रोजंदारी तत्त्वावर चालकांची नियुक्ती करण्यात यावी, यासाठी गेल्या वर्षभरापासून सिव्हिल सर्जन कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
दरम्यान, रुग्णवाहिका चालकांचे तब्बल १५ महिन्यांचे मानधन थकीत असून, अनेक चालकांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आरोग्यमंत्री, सहसंचालक, संचालक तसेच जिल्हाधिकारी यांनाही वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या एका वर्षात चार आंदोलनात्मक घटना घडल्या असून, त्यात दोन आत्मदहनाच्या इशाऱ्यांचा तसेच सहा महिन्यांत दोन उपोषणांचा समावेश आहे. तरीही सिव्हिल सर्जन कार्यालयाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
“रुग्णांच्या जीवाशी खेळणे तात्काळ थांबवावे, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे. तसेच बंद रुग्णवाहिका तातडीने सुरू करून चालकांना रुजू करून घ्यावे आणि थकीत १५ महिन्यांचे वेतन तत्काळ अदा करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यातच रुग्णवाहिकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे, त्यांनी हा प्रश्न लवकर मिटवावा, अशी मागणी होत आहे.

