Mahabreaking

[breaking_news]

Three Motor Pump Thieves:  मोटार पंप लंपास करणारे तिघे जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

Three Motor Pump Thieves: शेतकऱ्यांच्या  शेतातील मोटार पंप लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोन इलेक्ट्रिक मोटार पंप असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Three Motor Pump Thieves

पोत्यात लपवून मोटार पंप नेताना चोरटे पकडले; ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बुलढाणा : शेतकऱ्यांच्या  शेतातील मोटार पंप लंपास करणाऱ्या तीन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने जेरबंद केले असून, त्यांच्याकडून दोन इलेक्ट्रिक मोटार पंप असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या धडाकेबाज कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत माहिती अशी की, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी बळीराम सखाराम बऱ्हाटे (वय ३२, व्यवसाय – शेती, रा. आंधई ता. चिखली) यांनी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. ५ जानेवारीच्या सायंकाळी ६ ते ६ जानेवारीच्या सकाळी ७ वाजेदरम्यान आंधई शेतशिवारातील धरणावरून त्यांचा टोरमॅक्स कंपनीचा ७.५ एचपीचा मोटार पंप किंमत २० हजार रुपये तसेच शेजारील शेतकरी प्रल्हाद मानिकराव मोरे यांच्या विहिरीतील ५ एचपीचा मोटार पंप किंमत ५ हजार रुपये असा एकूण २५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. या प्रकरणी अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये अप.क्र. ०६/२०२६ कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतकऱ्यांच्या मोटार पंप चोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गुन्ह्याची उकल करून आरोपींना अटक करण्याचे तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी पथक तयार करून तपास सुरू केला.

दरम्यान, ६ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, आंधई येथील अतुल सौभागे, उमेश शेळके आणि आदेश चौथे हे आरोपी चोरीचे मोटार पंप विक्रीसाठी अमडापूर येथे घेऊन येत आहेत. या माहितीच्या आधारे पथकाने अमडापूर बसस्थानक परिसरात सापळा रचून कारवाई केली. यावेळी आरोपी पोत्यामध्ये लपवून दोन इलेक्ट्रिक मोटार पंप घेऊन जात असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपी अतुल भानदास सौभागे (वय १९), उमेश समाधान शेळके (वय ३२) आणि आदेश सुनिल चौथे (वय २४, सर्व रा. आंधई ता. चिखली, जि. बुलढाणा) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींकडून ७.५ हॉर्सपॉवर व ५ हॉर्सपॉवरचे दोन इलेक्ट्रिक मोटार पंप असा एकूण ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना अमडापूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, पोउपनिरीक्षक अविनाश जायभाये, पोहेकॉ. अनंता फरतळे, सुनील मिसाळ आणि पोलीस कॉन्स्टेबल गणेश वाघ यांच्या पथकाने केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top