Prakash Mukund :विदर्भातील शाळा मंगळवार, ३० जूनपासून सुरू होताच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (MEEPA) चे संचालक प्रकाश मुकुंद यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या हस्ते इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

तुळजापूरच्या जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात; शिक्षण संचालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत
गजानन तिडके
देऊळगाव राजा : विदर्भातील शाळा मंगळवार, ३० जूनपासून सुरू होताच महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (MEEPA) चे संचालक प्रकाश मुकुंद यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील तुळजापूर येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला भेट देऊन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाला उत्साहाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्या हस्ते इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, शालेय गणवेश आणि पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी शिक्षिका कल्याणी जाधव तसेच अंगणवाडी सेविका सुनिता तिडके आणि संगीता झीने यांनी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संचालक प्रकाश मुकुंद यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या शाळांची तुलना करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्या शौर्यकथा सांगत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, गुणवत्ता आणि जीवनमूल्ये रुजविण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे सांगितले.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर नागरे यांनी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्या कमी होण्यामागील कारणे आणि शिक्षकांवर शैक्षणिक कामाव्यतिरिक्त वाढत चाललेला अतिरिक्त कामांचा बोजा याबाबतची व्यथा संचालकांसमोर मांडली. शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांमध्ये गुंतविल्यामुळे अध्यापनावर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
संचालक प्रकाश मुकुंद यांचे स्वागत केंद्रप्रमुख विनोद सोनुने, प्रा. गजानन मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण कोल्हे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित मस्के यांनी केले.
याच कार्यक्रमात महात्मा फुले हायस्कूलचे शिक्षक भगवान गायकवाड हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने संचालक प्रकाश मुकुंद यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला पत्रकार गजानन तिडके, शिक्षक संतोष बिथरे, कल्याणी जाधव, महात्मा फुले हायस्कूलचे प्राध्यापक रमेश कठोर, संदीप शिंगणे, विलास लहाने, प्रदीप चित्ते, कल्याण पाड, राठोड, राऊत, संदीप शेरे, वंदना कांबळे, दिपाली डोंगरे, अंगणवाडी मदतनीस उषा मगर, ज्योती मगर, सुशीला गोरे तसेच पालक प्रतिनिधी गणेश तिडके, भाऊराव खरात, तान्हाजी खरात, दगडू गोरे, विक्रम मगर, दिलीप कोल्हे, रामदास कोल्हे, ज्ञानेश्वर कोल्हे, मुकुंदा झीने, शिवराम बोरुडे, संतोष कोल्हे यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थित होते.
शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याने शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

