Mahabreaking

[breaking_news]

  Yellow mosaic :येलो मोझॅकचा प्रादुर्भाव, पावसाचीही ओढ; खरीप पिके माना टाकू लागली

Yellow mosaic : बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. रुईखेड मायंबा, भडगाव आणि मोहोज परिसरात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव जाणवू लागला असून, दुसरीकडे पावसाअभावी शेतजमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनसह उडीद, मूग, कापूस, तूर, हळद आणि अद्रक पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे.

  Yellow mosaic

 पावसाअभावी जमिनीला भेगा, येलो मोझॅकमुळे सोयाबीन धोक्यात; धाड परिसरातील शेतकरी चिंतेत

बबन फेपाळे

रुईखेड मायंबा: बुलढाणा तालुक्यातील धाड परिसरात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांवर प्रतिकूल परिणाम होत आहे. रुईखेड मायंबा, भडगाव आणि मोहोज परिसरात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव जाणवू लागला असून, दुसरीकडे पावसाअभावी शेतजमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनसह उडीद, मूग, कापूस, तूर, हळद आणि अद्रक पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे.

सध्या दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. पिकांना पावसाची नितांत गरज असतानाही दमदार पाऊस होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीन, उडीद आणि मूग ही पिके शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. मात्र, पावसाअभावी शेंगा भरण्याच्या प्रक्रियेलाही फटका बसण्याची शक्यता आहे. कापूस पिकाला पाते लागण्याचा काळ सुरू असून, हळद व अद्रक पिकांचीही वाढ सुरू आहे. त्यामुळे या सर्व पिकांसाठी सध्या पुरेशा पावसाची आवश्यकता आहे.

येलो मोझॅकचा वाढता धोका

दरम्यान, येलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्यास सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मागील दोन वर्षांत येलो मोझॅकमुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. यंदा या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही, अशी अपेक्षा असतानाच काही भागात पुन्हा त्याची लक्षणे दिसू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

फुले व शेंगांची गळती

पावसाअभावी आणि वाढत्या उष्णतेमुळे पिकांवर ताण निर्माण झाला आहे. परिणामी फुले व शेंगांची गळती होत असून, पिकांच्या वाढीवरही परिणाम होत आहे. यंदा खरीप पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. पिके ऐन भरात असताना पावसाने ओढ दिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावरही त्याचा थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज

पावसाने ओढ दिलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. येलो मोझॅकच्या प्रादुर्भावासाठी कोणती फवारणी करावी, कोणती फवारणी टाळावी, तणनाशक व कीटकनाशकांचा योग्य वापर कसा करावा, खतांची मात्रा किती असावी, तसेच ठिबक व तुषार सिंचनाबाबत शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे आवश्यक आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना आवश्यक उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

“मागील दोन वर्षांपासून येलो मोझॅकमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. यंदा येलो मोझॅकचा प्रादुर्भाव होणार नाही, असे वाटत असतानाच काही प्रमाणात प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसत आहे. कोणती फवारणी करावी आणि कोणती करू नये, याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.”

— शालिकराम फेपाळे, शेतकरी, रुईखेड मायंबा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top