Dhantrayodashi : मानवी जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, उत्तम आरोग्य हीच सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवनाची खरी संपत्ती आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या पवित्र पर्वावर प्रत्येक कुटुंबाने आरोग्याचे दैवत भगवान धन्वंतरी यांची श्रद्धापूर्वक पूजा करावी आणि निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे नागरिकांना आवाहन
बुलढाणा : मानवी जीवनात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व असून, उत्तम आरोग्य हीच सुखी, समाधानी आणि समृद्ध जीवनाची खरी संपत्ती आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या पवित्र पर्वावर प्रत्येक कुटुंबाने आरोग्याचे दैवत भगवान धन्वंतरी यांची श्रद्धापूर्वक पूजा करावी आणि निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे.
भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये आरोग्याला नेहमीच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. दीपावली सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते. या दिवसाला भगवान धन्वंतरी यांच्या पूजनामुळे विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भगवान धन्वंतरी यांची उपासना ही केवळ धार्मिक परंपरा नसून, आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याची प्रेरणा देणारी आहे.
धनत्रयोदशीच्या दिवशी प्रत्येक कुटुंबाने भगवान धन्वंतरी यांचे पूजन करून आरोग्य संवर्धनाचा संकल्प करावा. दैनंदिन जीवनात योग, प्राणायाम, नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराला प्राधान्य द्यावे. बदलत्या जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहण्यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नियमित योगाभ्यास आणि आरोग्यदायी सवयींच्या माध्यमातून निरोगी जीवन जगता येते, असेही प्रतापराव जाधव यांनी सांगितले.
धनत्रयोदशीचा सण केवळ धन आणि समृद्धीचा उत्सव न मानता आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस म्हणूनही साजरा करावा. प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्यासोबतच कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी स्वीकारून निरोगी समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे. या पवित्र पर्वानिमित्त सर्वांनी आरोग्याबाबत सजग राहून निरोगी जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

