thieves : चिखली तालुक्यातील अमडापूर येथील बसस्थानकावर महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथ आणि मंगळसूत्रांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवापासून आतापर्यंत सहा ते सात महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. विशेष म्हणजे, बसस्थानकावर बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाही प्रभावीपणे कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत असल्याचे चित्र आहे.

एसटी बसमध्ये चढताना महिलांच्या गळ्यातील पोथ गायब; अमडापूर बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट!
हिवराखुर्द : चिखली तालुक्यातील अमडापूर येथील बसस्थानकावर महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथ आणि मंगळसूत्रांची चोरी होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने महिला प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नवरात्रोत्सवापासून आतापर्यंत सहा ते सात महिलांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना घडल्याची चर्चा आहे. मात्र, वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. विशेष म्हणजे, बसस्थानकावर बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणाही प्रभावीपणे कार्यरत नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत असल्याचे चित्र आहे.
अमडापूर बसस्थानकावर दररोज प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विशेषतः एसटी बस बसस्थानकात दाखल होताच बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडते. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोथ आणि मंगळसूत्रांवर डल्ला मारत असल्याचे समोर येत आहे. गर्दीच्या वेळी महिलांच्या गळ्यातील दागिने अलगद लंपास केले जात असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वारंवार अशा घटना घडूनही चोरट्यांचा बंदोबस्त होत नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
गर्दीचा फायदा घेत महिलेची दहा ग्रॅमची सोन्याची पोथ लंपास!
अलीकडेच ३१ ऑक्टोबर रोजी शनिवारी दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास अमडापूर येथून मेहकरकडे जाणारी एसटी बस बसस्थानकावर उभी होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. याच गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने हिवराखुर्द येथील एका महिलेच्या गळ्यातील सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याच्या मणी व डोरले असलेली पोथ चोरून नेली. गर्दीत कोणीतरी दागिने लंपास केल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेची धावपळ उडाली. या घटनेमुळे बसस्थानकावरील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पोलीस तक्रारींची नोंद घेत नसल्याचा नागरिकांचा आरोप!
अमडापूर बसस्थानकावर यापूर्वीही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनांबाबत अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या नागरिकांना टाळाटाळ केली जात असल्याचा तसेच उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अनेक चोरीच्या घटनांची अधिकृत नोंदच पोलिसांच्या दप्तरी होत नसल्याची चर्चा परिसरात आहे. परिणामी चोरट्यांचे मनोबल वाढत असून, पोलिसांच्या भूमिकेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोभेपुरतेच?
बसस्थानकाच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्यक्षात कार्यरत आहेत की नाहीत, त्यांचे चित्रीकरण नियमित तपासले जाते की नाही, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चोरीच्या घटना वारंवार घडत असताना सीसीटीव्ही यंत्रणेचा प्रभावी वापर का होत नाही, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. बसस्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या आगार प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
चोरट्यांचा बंदोबस्त करा; नागरिकांची मागणी
अमडापूर बसस्थानकावर वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. यापूर्वी घडलेल्या सर्व घटनांची चौकशी करून तक्रारींची अधिकृत नोंद घ्यावी, बसस्थानकातील सीसीटीव्ही यंत्रणा तातडीने कार्यान्वित करावी आणि गर्दीच्या वेळी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील नागरिक आणि प्रवाशांकडून होत आहे.
महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बसस्थानकावर सुरक्षित राहणार नसतील, तर महिलांनी प्रवास करायचा तरी कसा? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आता तरी अमडापूर पोलीस प्रशासन आणि एसटी आगार प्रशासन या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ठोस उपाययोजना करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

