Prataprao Jadhav : अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देत दुष्काळावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

लाडकी बहीण, पीएम किसान, कर्जमाफी अन् नदीजोड प्रकल्पातून शेतकऱ्यांना दिलासा; प्रतापराव जाधव यांचा घारोडमध्ये संवाद
बुलढाणा : अल-निनोच्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना आर्थिक आधार देत दुष्काळावर मात करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
खामगाव तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भागातील घारोड येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. साऊ एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने आयोजित भाऊबीज कार्यक्रमानिमित्त १० नोव्हेंबर रोजी रात्री केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घारोड गावाला भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासोबतच एकल व निराधार महिला देवकाबाई अढाव आणि दुर्गा अनंता कड यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली.

यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री जाधव म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी ही योजना महिलांना मोठा आर्थिक आधार ठरत आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. राज्य शासनानेही या योजनेत अतिरिक्त आर्थिक मदतीची भर घातली आहे. याशिवाय दिवाळी अग्रीम म्हणून पाच हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात आले आहेत. दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन विविध स्तरांवर उपाययोजना करीत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबरोबरच कर्जमाफी, नदीजोड प्रकल्प आणि जलसंधारणाच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना करण्यावरही शासनाचा भर आहे. पाण्याची उपलब्धता वाढवून शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील दुष्काळी परिस्थितीचा प्रभाव कमी करणे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
निराधार महिलांसोबत भाऊबीज; शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या
भाऊबीज कार्यक्रमानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी देवकाबाई अढाव यांच्या घरी भेट देऊन भाऊबीजेची ओवाळणी स्वीकारली. एकल व निराधार महिलांना भाऊ म्हणून आधार देण्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच दुर्गा अनंता कड यांच्याही घरी भेट देत त्यांच्यासोबत भाऊबीज साजरी केली.
यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसोबत बसून त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेतल्या. खरीप पिकांचे नुकसान, पाणीटंचाई, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न, कर्जाचा वाढता बोजा आणि शासनाकडून मिळालेली मदत याबाबत त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्या केंद्र व राज्य शासनाच्या स्तरावर मांडण्यासाठी अशा संवादात्मक कार्यक्रमांना महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
घारोड हे अतिदुर्गम डोंगराळ भागातील गाव असून, यंदाच्या दुष्काळाचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना बसला आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय राज्यमंत्र्यांनी थेट गावात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि निराधार महिलांसोबत दिवाळीचा सण साजरा केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
जलजीवन मिशनच्या अपूर्ण पाणीपुरवठा योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता
दरम्यान, घारोड गावातील पाणीपुरवठा योजनेच्या अपूर्ण कामाबाबतही महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती यावेळी देण्यात आली. जलजीवन मिशनअंतर्गत अपूर्ण असलेल्या पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. या मंजुरीचे पत्र केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी ग्रामपंचायतीचे सरपंच वैभव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केले. त्यामुळे गावातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी सरपंच वैभव ठाकरे, ॲड. अमोल अंधारे, राजेंद्र बघे, साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक तथा इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार सचिन ठाकरे, अक्षय मातनकार, राजेश कड, अनंता नरवाडे यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

