Mahabreaking

[breaking_news]

Instagram story :इन्स्टाग्राम स्टोरीवरून वाद; माफी मागण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलासह वडिलांना बेदम मारहाण, वडिलांचा मृत्यू!

Instagram story : सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरीवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासोबत आक्षेपार्ह मजकूर असलेली स्टोरी ठेवल्याच्या कारणावरून भालेगाव (ता. मेहकर) येथील १६ वर्षीय विद्यार्थ्याला माफी मागण्यास सांगण्यात आले. त्यानंतरही वाद मिटण्याऐवजी संबंधित मुलासह त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या मारहाणीदरम्यान प्रकृती खालावल्याने वडील निलेश अशोकराव निकम यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भालेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

Instagram story

 सोशल मीडियावरील पोस्ट ठरली जीवघेणी? मुलाच्या माफीनाट्यानंतरही पिता-पुत्राला मारहाण; वडिलांचा मृत्यू

मेहकर : सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम स्टोरीवरून सुरू झालेल्या वादाचे पर्यवसान एका दुर्दैवी घटनेत झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासोबत आक्षेपार्ह मजकूर असलेली स्टोरी ठेवल्याच्या कारणावरून भालेगाव (ता. मेहकर) येथील १६ वर्षीय विद्यार्थ्याला माफी मागण्यास सांगण्यात आले. त्यानंतरही वाद मिटण्याऐवजी संबंधित मुलासह त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. या मारहाणीदरम्यान प्रकृती खालावल्याने वडील निलेश अशोकराव निकम यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भालेगाव परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी मृत निलेश निकम यांचा अल्पवयीन मुलगा विराज निकम याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम १०५, ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविल्याची माहिती समोर आली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवरून वादाची ठिणगी

विराज निकम हा अमरावती येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. त्याने २ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्श्वभूमीला ठेवून आक्षेपार्ह मजकूर असलेली स्टोरी पोस्ट केली होती. ही स्टोरी २४ तासांनंतर आपोआप डिलीट झाली.

त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी सकाळी मेहकर येथील वेदांत भाळशंकर याने विराजला फोन करून स्टोरीबाबत जाब विचारला. त्यावेळी विराजने आपली चूक झाल्याचे मान्य करून पुन्हा अशी चूक होणार नाही, असे सांगत माफी मागितली. मात्र, त्यानंतरही त्याला मेहकरला येण्यास सांगून धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दाजींनीही मध्यस्थी करून मागितली माफी

या प्रकाराची माहिती विराजने आपले दाजी ऋषिकेश कैलास थोरात यांना दिली. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता ऋषिकेश थोरात यांनी मेहकर येथील वेदांत भाळशंकर, अनुराग भाळशंकर आणि अन्य दोघांची मातोश्री पान सेंटरसमोर भेट घेतली. यावेळी त्यांनीही विराजच्या वतीने माफी मागून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधितांनी ‘आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ’, असे म्हटल्याचा आरोप आहे.

दरम्यान, त्याच दिवशी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुमेध अवसरमोल याने विराजला फोन करून, यावेळी माफी मागितल्यामुळे सोडत असल्याचे सांगितले; मात्र यापुढे अशी चूक करू नये, असा इशाराही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सायंकाळी घरासमोर जमाव; पिता-पुत्राला मारहाण

सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास विराजचे वडील निलेश निकम हे शेतातून घरी परतत असताना काही तरुण मोटारसायकलींवरून त्यांच्या मागे घरासमोर आले. वडिलांनी आवाज दिल्यानंतर विराज घराबाहेर आला. त्यावेळी मेहकर, अंजनी बुद्रुक, नांद्रा धांडे, वरुड आणि भालेगाव येथील काही तरुण तेथे उपस्थित असल्याचे विराजने तक्रारीत म्हटले आहे. या वेळी संबंधितांनी विराजला माफी मागण्यास सांगितले. तो माफी मागत असतानाच जमावातील व्यक्तींनी त्याला आणि त्याच्या वडिलांना चापटाबुक्क्यांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, पिता-पुत्राला त्यानंतर गावातील वाटिका परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आले. तेथे पुन्हा माफी मागण्यास सांगून दोघांनाही मारहाण करण्यात आली. यावेळी विराजने आपल्या वडिलांच्या छातीत दुखत असल्याचे सांगून त्यांना मारहाण करू नये, अशी विनंती केली. मात्र, तरीही मारहाण सुरूच राहिल्याचा आरोप त्याने केला आहे. याचदरम्यान निलेश निकम यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली बेशुद्ध पडले. विराज माफी मागत असताना काही तरुणांनी त्याचा माफी मागतानाचा व्हिडिओ काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

रुग्णालयात नेले; डॉक्टरांनी केले मृत घोषित

घटनेची माहिती मिळताच निलेश निकम यांचे भाऊ शरद निकम, चुलत भाऊ अंकुश निकम आणि पार्थ निकम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बेशुद्ध अवस्थेतील निलेश निकम यांना चारचाकी वाहनातून मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे मानसिक धक्क्यात असलेल्या विराजने दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. आपल्या वडिलांच्या मृत्यूस मारहाण करणारेच जबाबदार असल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे.

अनेक संशयितांविरुद्ध गुन्हा; पुढील तपासाकडे लक्ष

या प्रकरणात विराजने वेदांत प्रकाश भाळशंकर, रणजीत सुरेश सदावर्ते, पवन,  करण वानखेडे, सुमित दीपक मोरे, अनुराग किशोर शेजुळ, पंकज अशोक सोनुने, सुमेध गौतम अवसरमोल, कार्तिक राजू आंभोरे यांच्यासह भालेगाव येथील ऋतिक दीपक सिरसाट, अनिकेत केशव अवसरमोल, वैभव अशोक गवई, बबन भाऊराव अवसरमोल, उमेश लक्ष्मण मिसाळ, बारक्या उर्फ करण वसुदेव अवसरमोल, धम्मपाल किशोर अवसरमोल, संग्राम संजय अवसरमोल, जीवन हिम्मत गवई, केशव आत्माराम अवसरमोल आणि विलास उत्तम अवसरमोल यांच्यासह इतर व्यक्तींवर आरोप केले आहेत.

या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५, ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टवरून सुरू झालेला वाद, त्यानंतर माफी मागण्याचे प्रयत्न आणि अखेरीस झालेला मृत्यू या घटनाक्रमामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सोशल मीडियावरील वाद मिटविण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना अशा प्रकारे जमावाने कायदा हातात घेतल्याचा आरोप गंभीर आहे. या घटनेची निष्पक्ष चौकशी करून प्रत्यक्ष दोषी कोण, मारहाणीत नेमकी कोणाची भूमिका होती आणि मृत्यूचे वैद्यकीय कारण काय, हे तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top