Wadegaon Shaken : पोलीस चौकीच्या हद्दीतील पेटकरवाडी येथे रविवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नागेश वसंता कळसाईत (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सात दिवसांत तीन आत्महत्यांच्या घटनांनी वाडेगावात चिंता; युवकाचा गळफासाने मृत्यू
राहुल सोनोने
वाडेगाव: पोलीस चौकीच्या हद्दीतील पेटकरवाडी येथे रविवारी सायंकाळी सुमारे ४ वाजता ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. नागेश वसंता कळसाईत (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागेश कळसाईत याने रविवारी राहत्या घरात गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रकाश झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत डोईफोडे व प्रदीप राजपूत यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी बाळापूर पोलिसांकडून नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास वाडेगाव पोलीस करीत आहेत.
आठवडाभरात तीन घटनांनी चिंता
दरम्यान, वाडेगाव परिसरात अवघ्या आठवडाभरात तीन आत्महत्यांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. सोमवारी तनुजा मानकर या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी ३० वर्षीय युवक प्रतीक इंगळे याने आत्महत्या केली. रविवारी नागेश कळसाईत यांच्या मृत्यूची घटना समोर आली.
सलग घडलेल्या या घटनांमुळे वाडेगाव परिसर हादरला असून, नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनांची कारणे समोर आणण्यासाठी संबंधित यंत्रणांनी गांभीर्याने तपास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

