Varud Shaken:डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुड गावात २८ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच ठिकाणी घरफोड्या करून धुमाकूळ घातला. चोरट्यांनी विशेषतः कुलूपबंद घरांना लक्ष्य करत घरातील किमती ऐवज लंपास केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुलूपबंद घरांमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; हजारो रुपयांचा एवज केला लंपास
डोणगाव : डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरुड गावात २८ जुलैच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तब्बल पाच ठिकाणी घरफोड्या करून धुमाकूळ घातला. चोरट्यांनी विशेषतः कुलूपबंद घरांना लक्ष्य करत घरातील किमती ऐवज लंपास केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरुड येथील सुवर्णा राठोड, शेषराव राठोड आणि प्रकाश रतन पवार हे कामानिमित्त पुणे येथे गेले होते. त्यांच्या घरांना कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे व पेट्यांची उचकापाचक करून किमती वस्तूंवर हात साफ केल्याचे समोर आले आहे.
याशिवाय गोविंदा अमरसिंग पवार तसेच आणखी एका शेजाऱ्याच्या घरातही चोरी झाली. हे कुटुंबीय रात्री दुसऱ्या घरात झोपण्यासाठी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून चोरी केल्याचे सांगण्यात आले.
एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याची माहिती सकाळी गावभर पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय अजमिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी पंचनामा करून ग्रामस्थांकडून माहिती संकलित केली असून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी डोणगाव पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.
कुलूपबंद घरांवरच चोरट्यांचा डोळा?
गेल्या काही दिवसांपासून डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुलूपबंद घरांना लक्ष्य करून चोरीच्या घटना वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीने बंद घरांमध्ये घरफोड्या झाल्याच्या घटना घडल्या असून, आता ग्रामीण भागातही चोरीचे सत्र सुरू झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. त्यामुळे रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांवर प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

