Accused apprehended : मेहकर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत तलवार आणि कारसह ₹3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 28 जुलै रोजी जानेफळ चौकातील लालाजी वाईन शॉपसमोर करण्यात आली.

जानेफळ चौकात पोलिसांचा सापळा; तलवार आणि कारसह तीन लाख पाच हजारांचा एवज जप्त
मेहकर : मेहकर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत धारदार तलवार बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली. या कारवाईत तलवार आणि कारसह ₹3 लाख 5 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई 28 जुलै रोजी जानेफळ चौकातील लालाजी वाईन शॉपसमोर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या टाटा इंडिगो (क्र. एमएच-37-जी-5170) कारमध्ये धारदार तलवार ठेवून एक इसम परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेत वाहनाची झडती घेतली.
झडतीदरम्यान कारच्या मागील सीटवर काळ्या रंगाच्या म्यानामध्ये पितळी मुठ असलेली धारदार तलवार आढळून आली. चौकशीअंती आरोपीने आपले नाव विशाल अशोक गायकवाड (वय 36, रा. दिवाणी कोर्ट मागे, मेहकर) असे सांगितले.
तलवार बाळगण्याबाबत कोणताही वैध परवाना आरोपीकडे नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी अंदाजे ₹5 हजार किमतीची तलवार आणि ₹3 लाख किमतीची टाटा इंडिगो कार असा एकूण ₹3.05 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 507/2026 नोंदविण्यात आला असून, आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम, 1959 मधील कलम 4/25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मेहकर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलोवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक गाडवे, पोहेकॉ. विजय बेंडवाल, प्रभाकर शिवणकर, लक्ष्मण कटके, पोकॉ. मोहम्मद परसूवाले, गणेश वैद्य, मनीष बाजड तसेच चालक पोकॉ. शिवाजी चिम यांनी सहभाग घेतला.

