Mahabreaking

[breaking_news]

Vaishnavi Jadhav :वैष्णवी जाधव हिने खेळाडू विद्यार्थ्यांना गिरवले योग प्रात्यक्षिकांचे धडे

Vaishnavi Jadhav : जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र कुंभारी, जय बजरंग माध्यमिक विद्यालय कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले.

Vaishnavi Jadhav
कुंभारी येथे दहा दिवसीय ग्रीष्मकालीन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

बोरगाव मंजू : जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र कुंभारी, जय बजरंग माध्यमिक विद्यालय कुंभारी आणि जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न झाले.

या शिबिरात जय बजरंग व्यायाम शाळेची विद्यार्थिनी व योग प्रशिक्षक वैष्णवी विश्वास जाधव हिने सहभागी शालेय खेळाडू विद्यार्थ्यांना योगसाधना, योगाचे महत्त्व आणि सुदृढ व निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या विविध योगप्रकारांचे प्रेरणादायी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण शिबिरात ग्रामीण भागातील सुमारे २०० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.

दहा दिवसीय शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना योगसाधना, तणावमुक्त जीवनासाठी योगाचे महत्त्व, विविध योगासने, प्राणायाम तसेच शालेय जीवनातील विविध स्पर्धांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. वैष्णवी जाधव हिने विद्यार्थ्यांना योगाच्या माध्यमातून शारीरिक व मानसिक आरोग्य कसे सुदृढ ठेवता येते, याबाबत मार्गदर्शन केले.

शिबिरात तज्ज्ञ योग प्रशिक्षक प्रा. विश्वास जाधव आणि वैष्णवी जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान यांची सखोल प्रात्यक्षिके करून दाखविली. योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढते, तर प्राणायामामुळे मानसिक तणाव कमी होऊन मन प्रसन्न राहते, याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

शिबिराच्या समारोपप्रसंगी वैष्णवी विश्वास जाधव आणि प्रा. विश्वास जाधव यांच्या निःशुल्क सेवेसाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष नारायणराव गावंडे, अमरावती विभागीय क्रीडा संचालक गणेशराव जाधव, संचालक प्रकाशराव बिडकर, वन अधिकारी सुमंतराव सोळंके, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी सुभाषराव भालेराव, प्राचार्य शत्रुघ्नराव बिडकर, जिल्हा प्रमुख गजाननराव म्हैसने, प्रा. श्रीराम पालकर, जानराव आगळे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षणासोबतच वैष्णवी मुलींना गिरवते योगाचे धडे

वैष्णवी विश्वास जाधव ही चांदूरबाजार तालुक्यातील घुईखेड येथील रहिवासी असून जय बजरंग व्यायाम शाळेची उत्कृष्ट योगपटू विद्यार्थिनी आहे. तिचे वडील प्रा. विश्वास जाधव हे योग शिक्षक आहेत. वैष्णवी सध्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे एम.ए. योगशास्त्रचे शिक्षण घेत असून शिक्षणासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थिनी व मुलींना योगाचे प्रशिक्षण देत आहे. तिच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top