Simhastha Kumbh Mela :नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर, मंत्री, अधिकारी तसेच साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याला नवे बोधचिन्ह; देशभरातून ३ हजारांहून अधिक प्रवेशिका
मुंबई : नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर, मंत्री, अधिकारी तसेच साधू-संत मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण लोगो तयार करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने देशव्यापी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सुमारे ३ हजारांहून अधिक प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. अंतिम फेरीत निवड झालेल्या तीन उत्कृष्ट स्पर्धकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणारे पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. द्वितीय क्रमांकासाठी नोएडा येथील मयांक नायक यांना दोन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांक पटकावणारे पंढरपूर येथील पीयूष पिंपळनेरकर यांना एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
या लोगो स्पर्धेतील प्रवेशिकांचे परीक्षण प्रसिद्ध गीतकार व जाहिरात तज्ज्ञ प्रसून जोशी, अश्विनी देशपांडे, मंदार राणे, वृषाली केकणे (देशमुख), बारिश दाते, विनय नारंग, डॉ. प्राजक्ता बास्ते, प्रफुल्ल सावंत, डॉ. दिनेश वैद्य, अँथनी लोपेझ आणि डॉ. किरण शिंदे या डिझाइन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या समितीने केले. सर्जनशीलता, नाविन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांच्या आधारे अंतिम निवड करण्यात आली. या तज्ज्ञ समितीचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे , उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू-संत उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित साधू-संतांचे स्वागत केले.
बोधचिन्हाची वैशिष्ट्ये
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे हे बोधचिन्ह धार्मिक परंपरा, अध्यात्म आणि स्थानिक सांस्कृतिक वारशाचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आले आहे. या बोधचिन्हात भगवान शंकराच्या त्रिशूळाचा समावेश करण्यात आला असून तो आध्यात्मिक उर्जेचे प्रतीक मानला जातो. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती प्रादेशिक धार्मिक वारशाचे दर्शन घडवते.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, MyGov India आणि Association of Designers of India यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत एकूण ३,०६७ प्रवेशिका प्राप्त झाल्या होत्या. यामध्ये ७० आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचाही सहभाग होता. सहभागाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आघाडीवर राहिले असून त्याखालोखाल दिल्ली आणि तामिळनाडूचा क्रमांक लागला. १८ ते २४ वयोगटातील तरुणांचा सहभाग सर्वाधिक होता.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

