stole agricultural produce : तालुक्यातील भिवगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरासमोर ठेवलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यांवर डल्ला मारत तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा शेतीमाल लंपास केल्याची घटना ११ जानेवारीच्या पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील भिवगाव येथे अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याच्या घरासमोर ठेवलेल्या सोयाबीनच्या कट्ट्यांवर डल्ला मारत तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा शेतीमाल लंपास केल्याची घटना ११ जानेवारीच्या पहाटे उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवगाव येथील शेतकरी ओम मधुकर चव्हाण यांनी आपल्या शेतात उत्पादित झालेले सोयाबीन कट्ट्यांमध्ये भरून घरासमोरील ओट्यावर साठवून ठेवले होते. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने घटनेच्या रात्री फिर्यादी व त्यांचे मित्र घराबाहेर शेकोटी करून बसले होते. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी झोपण्यासाठी निघून गेले.
मात्र सकाळी उठून पाहिले असता, घरासमोरील ओट्यावर ठेवलेले एकूण ७२ सोयाबीनचे कट्टे आढळून आले नाहीत. त्यापैकी ७० कट्टे (किंमत अंदाजे १ लाख ८० हजार रुपये) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
शेतकऱ्यांच्या पशुधनासह आता शेतीमालावरही चोरट्यांचा डोळा असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीत रात्रंदिवस कष्ट करून पिकवलेला माल अशा प्रकारे चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या घटनेप्रकरणी फिर्यादी ओम चव्हाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली देऊळगाव राजा पोलीस करीत आहेत.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

