Udhav Sena holds: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा येथे पक्षाच्या वतीने विविध सामाजिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गर्दे हॉल येथे कार्यकर्ता मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाने संघटनात्मक एकजूट आणि जनसंपर्कावर भर दिला.

कार्यकर्ता मेळावा, गुणवंतांचा सत्कार आणि सेवा उपक्रम; बुलढाण्यात उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात
बुलढाणा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा येथे पक्षाच्या वतीने विविध सामाजिक आणि संघटनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त गर्दे हॉल येथे कार्यकर्ता मेळावा, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच विविध सेवा उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाने संघटनात्मक एकजूट आणि जनसंपर्कावर भर दिला.

कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके, विधानसभा सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने, उपजिल्हाप्रमुख लखन गडेकर, गजानन उबरहंडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्याचे, जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करण्याचे आणि आगामी राजकीय आव्हानांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा समन्वयक गजानन धांडे, विधानसभा संघटक सुनील घाटे, तालुकाप्रमुख विजय इतवारे, विजय इंगळे, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख प्रतीक्षा पिंपळे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले. रविवारी सकाळी बुलढाणा येथील जगदंबा देवी मंदिरात देवीला पातळ अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, प्रवक्त्या जयश्री शेळके, डी. एस. लहाने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले.
कार्यक्रमादरम्यान पक्षाच्या नेतृत्वावरील निष्ठा व्यक्त करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी पक्षविस्तार, जनसंपर्क आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यावर भर देण्याची भूमिका मांडली.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुलढाणा जिल्ह्यातील संघटनात्मक ताकद दाखविण्याबरोबरच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी संवाद वाढविण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

