Two seriously injured :राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नजीक कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. सचिन वायस्कार व राजू तायडे अशी जखमींची नावे आहेत. दोघांना उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावरील अनधिकृत मार्ग ठरतोय धोकादायक; कार-दुचाकी अपघातात दोघे गंभीर
बोरगाव मंजू : राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाशिंबा नजीक कार आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना ३० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. सचिन वायस्कार व राजू तायडे अशी जखमींची नावे आहेत. दोघांना उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाशिंबा नजीक एका गोडाऊनसमोर कार क्रमांक एमएच ३१ डीके ५५५५ आणि दुचाकीची धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील सचिन वायस्कार व राजू तायडे हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील वानखडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे, शेखर कोद्रे, महादेव पातोंड, सुदीप राऊत, नारायण शिंदे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करीत आहेत.
सुरक्षा दुभाजक तोडून अनधिकृतपणे वाहतूक
दरम्यान, अपघातस्थळाजवळ महामार्गाच्या मध्यभागी असलेला सुरक्षा दुभाजक संबंधित विभागाची परवानगी न घेता तोडून रस्ता तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूंच्या महामार्गावरून वाहने क्रॉस करून जवळील खासगी कंपनीच्या गोडाऊनकडे ये-जा करीत असल्याचे दिसून येते.
महामार्गावरील सुरक्षा दुभाजक अनधिकृतपणे तोडून वाहतुकीसाठी मार्ग तयार केल्यामुळे भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने या बाबीची तातडीने दखल घेऊन अनधिकृत मार्ग बंद करून सुरक्षा दुभाजक पूर्ववत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

