Two goats stolen along with an Eco van : तालुक्यातील पांग्री येथे अज्ञात चोरट्यांनी एका भाजीपाला विक्रेत्याचे जुने मारुती सुझुकी ईको वाहन तसेच दोन बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील पांग्री परिसरात अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ; पोलिसांत गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील पांग्री येथे अज्ञात चोरट्यांनी एका भाजीपाला विक्रेत्याचे जुने मारुती सुझुकी ईको वाहन तसेच दोन बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी एकूण १ लाख ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रल्हाद नारायण मेहतर (वय ३४, रा. लाड सावंगी, ता. जि. संभाजीनगर) हे भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. दि. १३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते १४ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान, ग्राम पांग्री येथून त्यांचे पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी ईको (क्र. MH08R6366) हे वाहन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
या वाहनाची अंदाजे किंमत १ लाख ९१ हजार रुपये इतकी असून, याच वेळी ग्राम सिंगाव जहागीर येथील नाजेखॉ बन्ने खा पठाण यांच्या दोन शेळ्या चोरीला गेल्या. त्या बकऱ्यांची किंमत सुमारे ८ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यामुळे चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ९९ हजार रुपये इतकी होते. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये कायमी गुन्हा क्रमांक १६४/२०२६ दाखल करण्यात आला आहे. ही नोंद महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सुषमा उईके यांनी केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ब्रम्हागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कुटे करीत आहेत.दरम्यान, वाहनासह जनावरे चोरीला गेल्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही, स्थानिक माहितीदार तसेच वाहनांच्या हालचालींची माहिती तपासली जात असल्याचे समजते.

