Two cows die : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांत गोवंश चोरी आणि संशयित मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. रेणुकामाता नगरातील शेतकरी नितीन उत्तमराव राहूळकर आणि तपे हनुमान नगर येथील पशुपालक अर्जुन लसनकार यांच्या दोन बारा महिन्यांच्या गोवंशांचा ६ डिसेंबर २०२५ रोजी हृदयद्रावक मृत्यू झाला.

पशुपालक चिंतेत; पातूर पोलिसात तक्रार,जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी
पातूर : शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांत गोवंश चोरी आणि संशयित मृत्यूच्या घटना वाढल्या आहेत. रेणुकामाता नगरातील शेतकरी नितीन उत्तमराव राहूळकर आणि तपे हनुमान नगर येथील पशुपालक अर्जुन लसनकार यांच्या दोन बारा महिन्यांच्या गोवंशांचा ६ डिसेंबर २०२५ रोजी हृदयद्रावक मृत्यू झाला.
दोन्ही गुरे घरापासून शंभर मीटर अंतरावर चरायला गेल्यानंतर परत आली. मात्र चारापाणी करताना वासरांच्या तोंडातून फेस येत असल्याचे दिसून आले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत नितीन राहूळकर यांनी पातूर पोलिसात तक्रार दिली असून पशुवैद्यकीय अधिकारी, अकोला यांनी दोन्ही गोवंशांचे शवविच्छेदन केले आहे. राहूळकर यांनी दिलेल्या निवेदनात संबंधित आरोपींचे नाव नमूद करून तक्रार दिली असतानाही पोलिसांनी ती स्वीकारली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक डोपेवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश खंडारे करीत आहेत.
शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
“गुरे चरायला गेली असता कुणीतरी गव्हाच्या पिठात विषारी द्रव मिसळून गोळे फेकले. ते गुरांनी खाल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. आम्ही आरोपीचे नाव देऊन तक्रार दिली, मात्र ती पोलिसांनी स्वीकारली नाही. आमचे ३० ते ४० हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अशा कृत्य करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी.”
— नितीन राहूळकर, शेतकरी, रेणुका नगर, पातूर
स्थानिक पातळीवर सतत वाढत्या गोवंश चोरीच्या आणि संशयास्पद मृत्यूंच्या घटनांमुळे पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी व पशुपालकांकडून होत आहे.

