Mahabreaking

[breaking_news]

Took the life: जन्मदात्याचाच घेतला जीव! पैशांच्या वादातून मुलाकडून वडिलांना बेदम मारहाण

Took the life: बकरी विक्रीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नायगाव बु. येथे घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २९ ऑगस्टच्या रात्री घडली असून, अमडापूर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

Took the life

 चार मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपले; आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात

चिखली : बकरी विक्रीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकुलत्या एक मुलाने आपल्या जन्मदात्या वडिलांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नायगाव बु. येथे घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वडिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २९ ऑगस्टच्या रात्री घडली असून, अमडापूर पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.

मृतकाचे नाव कचरुबा वामन गायकवाड (वय ६०) असे आहे. ते पत्नी बेबीबाई यांच्यासह कुटुंबीयांसोबत राहत होते. त्यांना एकुलता एक मुलगा व चार मुली आहेत. ज्या मुलाकडून आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात आधाराची अपेक्षा होती, त्याच मुलाच्या हातून वडिलांचा जीव गेल्याने गायकवाड कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेषतः चार मुलींच्या डोक्यावरील पित्याचे छत्र हरपल्याने परिसरातील नागरिकांचेही मन हेलावून गेले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास कचरुबा गायकवाड यांनी त्यांचा मुलगा विनोद कचरुबा गायकवाड (वय ३८) याच्याकडे बकरी विक्रीचे पैसे मागितले. यावरून पिता-पुत्रामध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. रागाच्या भरात विनोद याने वडिलांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर लोखंडी फुकणीने त्यांच्या पोटावर, छातीवर व डोक्यावर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या कचरुबा गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

बकरी विक्रीच्या पैशांवरून सुरू झालेला वाद अखेर वडिलांच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने नायगाव बु. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतकाची पत्नी बेबीबाई कचरुबा गायकवाड यांच्या फिर्यादीवरून आरोपी विनोद गायकवाड याच्याविरुद्ध अमडापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १०३(१), ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी विनोद गायकवाड याला अटक केली.

या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार जयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी सानप व रायटर प्रदीप चोपडे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top