Thieves target : येथे ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी चारचाकी वाहनातून येऊन दीपाली ज्वेलर्स या दुकानात चोरी केली. चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने दुकानाचे शटर व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्ला घेऊन पोबारा केला. मात्र, मौल्यवान दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असल्याने मोठी चोरी टळली. चोरट्यांच्या हाती गल्ल्यातील सुमारे १ हजार ५०० रुपयांची रोकड लागल्याची माहिती आहे.

मध्यरात्री शटर फोडून ज्वेलर्समध्ये चोरी; पाच चोरटे सीसीटीव्हीत कैद
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : येथे ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी चारचाकी वाहनातून येऊन दीपाली ज्वेलर्स या दुकानात चोरी केली. चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने दुकानाचे शटर व कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील गल्ला घेऊन पोबारा केला. मात्र, मौल्यवान दागिने लॉकरमध्ये सुरक्षित असल्याने मोठी चोरी टळली. चोरट्यांच्या हाती गल्ल्यातील सुमारे १ हजार ५०० रुपयांची रोकड लागल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार युवराज रबडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला. दरम्यान, नाकाबंदी दरम्यान जालना पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती असून, इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलिसांनी या चोरीप्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, रात्री सुमारे अडीच ते तीन वाजण्याच्या दरम्यान ईको वाहनातून चोरटे घटनास्थळी आल्याचे दिसून आले. सुमारे पाच चोरट्यांनी कटरच्या साहाय्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. सुमारे अर्ध्या तासात चोरट्यांनी दुकानातील गल्ला तसेच डीव्हीआर घेऊन चारचाकी वाहनातून पलायन केले.
चोरट्यांनी दुकानातील काचा व इतर साहित्याचीही तोडफोड केली. तसेच शेजारील काही दुकानांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केल्याची माहिती आहे.
दरम्यान, चोरट्यांनी किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन-तीन दिवसांपूर्वी एक वाहन चोरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याच वाहनातून चोरटे मलकापूर पांग्रा येथून पसार झाले. मात्र, किनगाव राजा पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहनातील तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन बंद पडले. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या वाहनाचा वापर करून जालन्याच्या दिशेने पलायन केल्याची माहिती आहे.
ज्या ठिकाणी वाहन बंद पडले, त्या परिसरात गल्ल्यातील काही सामान पडलेले आढळून आल्याने चोरीचा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी दीपाली ज्वेलर्सचे मालक वसंतराव उदावंत यांचा फोटो आढळल्याने नागरिकांनी फोटोच्या आधारे त्यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यानंतर उदावंत यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता शटर तुटलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तातडीने साखरखेर्डा पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार युवराज रबडे यांच्यासह दुय्यम ठाणेदार संदीप मेधाने, बीट जमादार निवृत्ती पोफळे, बुलढाणा येथील फॉरेन्सिक पथक तसेच श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ठाणेदार युवराज रबडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार संदीप मेधाने व बीट जमादार निवृत्ती पोफळे पुढील तपास करीत आहेत.
विशेष म्हणजे, मलकापूर पांग्रा येथील दीपाली ज्वेलर्स सन २००० पासून सुरू आहे. सन २००० ते २०२६ या कालावधीत या ज्वेलर्समध्ये चोरी अथवा दरोड्याची ही चौथी घटना असल्याची माहिती आहे. मात्र, यावेळच्या घटनेत मौल्यवान दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. तरीही चोरट्यांनी चॅनेल गेट, शटर, कपाट, शोकेस तसेच इतर साहित्याची तोडफोड केल्याने दुकानमालकाचे अंदाजे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

