Theft at Bhonde petrol pump : धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा परिसरातील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उकल करत अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची संपूर्ण रोकड (१०० टक्के रिकव्हरी) जप्त करण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे.

चोरी 24 तासांत उघड; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी
गजानन तिडके
बुलढाणा : धाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करडी फाटा परिसरातील भोंडे पेट्रोल पंपावर झालेल्या चोरीच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी उकल करत अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची संपूर्ण रोकड (१०० टक्के रिकव्हरी) जप्त करण्यात आली असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी अंकुश ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे.
जिल्ह्यात घरफोडी व चोरीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर गुन्ह्यांची सखोल चौकशी करून आरोपींचा शोध घेण्याचे तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांनी स्वतंत्र तपास पथके तयार करून धाड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक २७३/२०२६ (कलम ३०३(२), भारतीय न्याय संहिता २०२३) चा समांतर तपास सुरू केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडू संतोषराव भोंडे (वय ३७, रा. म्हसला बुद्रुक, ता. जि. बुलढाणा) यांनी धाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या करडी फाटा येथील भोंडे पेट्रोल पंपातून १५ ते १६ जुलै २०२६ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्याने १ लाख ५ हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक माहिती, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि स्थानिक तपासाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वप्नील नुदाराम वाघमारे (वय १९, रा. मोंढाळा, ता. जि. बुलढाणा) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीस गेलेली १ लाख ५ हजार रुपयांची संपूर्ण रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे या गुन्ह्यातील मुद्देमालाची शंभर टक्के वसुली करण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड व पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आशीष रोही यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रताप बाजड, पोहेकॉ. शरद गौरी, जगदेव टेकाळे, पुरुषोत्तम अघाव आणि युवराज राठोड यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.

