the farmer : काही दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण पावसाळाच कोरडा गेल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील सुमारे ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगाम धोक्यात आला असून, तब्बल ४१ हजार खातेदार शेतकऱ्यांचे पीक उत्पादन हातातून गेल्याचे चित्र आहे. चार महिने आकाशातील ढगांकडे टक लावून पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत आता पिकांच्या नुकसानीचे अश्रू आहेत. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर पीक नुकसान भरपाईच्या मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आणले पाणी; पंचनामे करताना अधिकारी-कर्मचारीही झाले भावूक
बबन इंगळे
बार्शीटाकळी : काही दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण पावसाळाच कोरडा गेल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील सुमारे ५४ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप हंगाम धोक्यात आला असून, तब्बल ४१ हजार खातेदार शेतकऱ्यांचे पीक उत्पादन हातातून गेल्याचे चित्र आहे. चार महिने आकाशातील ढगांकडे टक लावून पाहणाऱ्या बळीराजाच्या डोळ्यांत आता पिकांच्या नुकसानीचे अश्रू आहेत. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर पीक नुकसान भरपाईच्या मदतीची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.
कोरड्या दुष्काळाच्या या वास्तवाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या खचला असला तरी परिस्थितीशी दोन हात करण्याचा त्याचा धीर अद्याप कायम आहे. करपलेली पिके, ओस पडलेली शेतशिवारं आणि हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेला असताना बळीराजा शासनाच्या मदतीकडे आशेने पाहत आहे.
पंचनामे करताना अधिकारी-कर्मचारीही झाले भावूक
राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर गेल्या आठवड्यापासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन पीक नुकसानीचे पंचनामे करीत आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर करपलेली पिके आणि त्यांच्या तोंडून ऐकू येणाऱ्या व्यथा पाहून पंचनामे करणारे अधिकारी व कर्मचारीही अनेकदा भावूक होत आहेत.
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पीक नुकसान भरपाईची आर्थिक मदत जमा व्हावी, यासाठी शासकीय सुट्टीच्या दिवशीही पंचनामे आणि कार्यालयीन कामकाज सुरू ठेवण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा एकही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.
पीक पंचनाम्याची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी अकोला जिल्हाधिकारी वर्षा मिना यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीटाकळीचे उपविभागीय अधिकारी मिलिंद जगदाळे, तहसीलदार रविंद्र कापसीकर, तालुका कृषी अधिकारी संध्या करवा, नायब तहसीलदार अतुल सोनवणे, अक्षय नागे तसेच महसूल मंडळ अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
कामाच्या शोधात आदिवासी मजुरांचे स्थलांतर
यंदाच्या खरीप हंगामाला कोरड्या दुष्काळाची मोठी झळ बसल्याने बार्शीटाकळी तालुक्यातील आदिवासीबहुल भागातील शेतकरी आणि शेतमजुरांवर कामाच्या शोधात स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. सध्या तालुक्यातील अनेक कुटुंबे रोजगाराच्या शोधात राज्यातील विविध भागांकडे रवाना होत असल्याचे चित्र आहे.
कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न यांसारख्या जबाबदाऱ्या डोळ्यांसमोर असल्याने अनेक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर कुटुंबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गावातच रोजगार उपलब्ध न झाल्यास आगामी काळात स्थलांतराची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘साहेब, गट भरू की पोट भरू?’
खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच काही शेतकऱ्यांनी पीक कर्जासह खासगी मायक्रो फायनान्स संस्थांकडून वैयक्तिक तसेच गटाच्या माध्यमातून कर्ज घेतले होते. मात्र, खरीप हंगामाचेच उत्पन्न बुडाल्याने आता हे कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
गटाचे कर्ज घेतल्यानंतर विहित मुदतीत परतफेड करण्यासाठी खासगी मायक्रो फायनान्स संस्थांचे वसुली अधिकारी सकाळीच घराच्या दारात येऊन थांबतात. एका बाजूला कर्जाची परतफेड आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाचा उदरनिर्वाह, अशा कात्रीत शेतकरी व शेतमजूर सापडले आहेत.
‘साहेब, गट भरू की पोट भरू?’ हा सवाल सध्या दुष्काळग्रस्त शेतकरी आणि शेतमजुरांच्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करीत आहे. करपलेली पिके आणि वाढते कर्ज यामुळे आर्थिक विवंचना वाढली असली तरी शासनाकडून मिळणाऱ्या मदतीच्या आशेवर बळीराजा अजूनही उभा आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

