Mahabreaking

[breaking_news]

soybean set ablaze :  दुष्काळात १२ एकरांची सोयाबीन गंजी पेटवली; महाल्ले कुटुंबाचे पाच लाखांचे नुकसान

soybean set ablaze : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द परिसरात सोंगून ठेवलेली १२ एकरांतील सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटविल्याची घटना शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या आगीत महिला शेतकरी अनुसया सुभाष महाल्ले यांचे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

soybean

  रविवारी काढणी होती, शनिवारीच गंजी जळून खाक; अज्ञात व्यक्तीच्या कृत्याने शेतकरी हादरले

राहुल सोनोने

वाडेगाव : पातूर तालुक्यातील दिग्रस खुर्द परिसरात सोंगून ठेवलेली १२ एकरांतील सोयाबीनची गंजी अज्ञात व्यक्तीने पेटविल्याची घटना शनिवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या आगीत महिला शेतकरी अनुसया सुभाष महाल्ले यांचे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

अनुसया महाल्ले यांनी उषाबाई उल्हास महाल्ले, तुळशीदास रामचंद्र महाले आणि प्रकाश रामचंद्र महाले यांची एकूण १२ एकर शेती दीड लाख रुपये ठोक्याने केली होती. त्यासाठी घर व गटावर कर्ज घेत त्यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. मोठ्या मेहनतीने पिकविलेले सोयाबीन काढणीसाठी शेतात गंजीच्या स्वरूपात ठेवण्यात आले होते.

रविवारी सोयाबीन काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्याच्या आदल्या रात्रीच अज्ञात व्यक्तीने सोयाबीनची गंजी पेटविल्याने संपूर्ण हंगामातील मेहनतीवर पाणी फेरले गेले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने सोयाबीन जळून खाक झाले.

आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यात कर्ज काढून पिकविलेले सोयाबीन आगीत जळून खाक झाल्याने अनुसया महाल्ले यांच्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

महसूल व कृषी विभागाकडून पंचनामा

घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मंडल अधिकारी शेफाली देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैभवी रौंदळे, सहायक कृषी अधिकारी मनोज पेंढारकर आणि महसूल मित्र यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीचा पंचनामा केला. पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे.

पोलिसांकडूनही घटनास्थळी पाहणी

या घटनेबाबत पातूर पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पातूरचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अजय वानखडे आणि शंकर बोरकर यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या घटनेमागील कारण तसेच गंजी पेटविणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पातूर पोलिसांकडून सुरू आहे.

दुष्काळाच्या संकटात कर्ज काढून उभे केलेले पीक आगीत जळून गेल्याने महाल्ले कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीची तातडीने पाहणी करून आर्थिक मदत द्यावी आणि सोयाबीनची गंजी पेटविणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

चौकट

महाल्ले कुटुंबावर उपासमारीची वेळ!

कर्ज काढून शेती करणाऱ्या अनुसया महाल्ले यांच्या १२ एकरांतील सोयाबीनची गंजी जळून खाक झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच दुष्काळामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या या कुटुंबाला आगीत सोयाबीन जळाल्याने मोठा फटका बसला आहे. शासनाने तातडीने नुकसानीची पाहणी करून आर्थिक मदत द्यावी, तसेच गंजी पेटविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top