The use of vermicompost :किटकनाशक आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे जमीनीची उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे आता शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. त्यातच आता पिकांच्या उत्पादनासाठी गांडूळ खताचा वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता उत्पादनात अस्थिरता स्पष्टपणे जाणवत असून, सन 2025-26 मध्येही उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

डोणगावात सुशिक्षित तरुणाने सुरू केली गांडूळ खत निर्मिती
डोणगाव : किटकनाशक आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे जमीनीची उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे आता शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळले आहेत. त्यातच आता पिकांच्या उत्पादनासाठी गांडूळ खताचा वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली असता उत्पादनात अस्थिरता स्पष्टपणे जाणवत असून, सन 2025-26 मध्येही उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
काळी माती सुपीक असली तरी सातत्याने रासायनिक खतांचा वाढता वापर केल्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. त्यामुळे शेती पद्धतीत बदल करणे गरजेचे असल्याचा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर सेंद्रिय खतांचा वापर आणि हवामानानुसार पीक नियोजन करण्यावर भर देण्याची गरज व्यक्त होत आहे.
याच समस्येवर उपाय म्हणून डोणगाव येथील बी.एस्सी. अॅाग्री पदवीधर सुशिक्षित तरुण सागर पांडव यांनी गांडूळ खत निर्मितीचा उपक्रम सुरू केला आहे. फावल्या वेळात गांडुळे गोळा करून व शेण व इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून ते गांडूळ खत तयार करत आहेत. हे खत रासायनिक खतांपेक्षा कमी खर्चिक असल्यामुळे शेतकऱ्यांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गांडूळ खत हे पूर्णपणे नैसर्गिक असून ते मातीची सुपीकता वाढविण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध असल्याने पिकांची वाढ जलद होते. तसेच मातीचा पोत सुधारतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होते. रासायनिक खतांचा वापर कमी झाल्यामुळे खर्चात बचत होण्यासोबतच पर्यावरणालाही फायदा होतो.
भाजीपाला, फळबागा, धान्य पिके तसेच ऊस आणि फुलझाडांसाठी गांडूळ खत अत्यंत उपयुक्त ठरत आहे. टोमॅटो, मिरची, वांगी यांसारख्या पिकांमध्ये उत्पादन आणि गुणवत्ता सुधारते, तर आंबा, डाळिंब यांसारख्या फळबागांमध्ये फळधारणा वाढते.
सागर पांडव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, पिकांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आणि मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी गांडूळ खताचा अधिकाधिक वापर करावा. एकंदरीत, डोणगाव परिसरात सेंद्रिय शेतीच्या दिशेने उचललेले हे पाऊल भविष्यात शाश्वत शेतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे दिसून येत आहे.

