Rohit Pawar : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ७ मे रोजी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली; न्यायासाठी लढा देण्याची ग्वाही
राहुल सोनोने
दिग्रस बू : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६० वर्षीय व्यक्तीने अत्याचार केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ७ मे रोजी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने अल्पवयीन मुलीचा तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच ही घटना कोणाला सांगितल्यास आईला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. ५ मे रोजी दुपारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली. पीडित मुलीच्या आईने चान्नी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असताना आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी भेट देत पीडित कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. “राज्यात अशा प्रकारच्या घटना वाढत असतील तर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे,” असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली.
यावेळी आमदार नितीन देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शंकर शेळके, ठाणेदार रवींद्र लांडे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. गावातील महिलांनीही संताप व्यक्त करत “राज्यात मुली सुरक्षित नसतील तर मुलींना जन्माला घालणेच कठीण होईल,” अशी तीव्र प्रतिक्रिया दिली.
पीडित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
रोहित पवार यांनी पीडित मुलीशी संवाद साधल्यानंतर ती शिक्षणात हुशार असल्याचे सांगत तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याची घोषणा केली. तसेच या घटनेचा निषेध व्यक्त करत राज्यात वाढत्या अत्याचारांच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर कायदे आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू”
पीडित कुटुंबीयांना धीर देताना रोहित पवार यांनी “मुलीला न्याय मिळेपर्यंत आपण हा विषय सोडणार नाही. आरोपीविरुद्ध कठोर कारवाईसाठी सातत्याने पाठपुरावा करू,” अशी ग्वाही दिली. या भेटीनंतर परिसरातील राजकीय वातावरणही तापले असून, विरोधकांकडून राज्य सरकारच्या कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

