Pavitra portal : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. पवित्र प्रणालीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या फेरीत खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षक होण्याचे स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठे पाऊल; १०,३२८ पदांसाठी गुणवत्ता यादी जाहीर
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेला आता वेग आला आहे. पवित्र प्रणालीमार्फत राबविण्यात येत असलेल्या शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती २०२५ अंतर्गत मुलाखतीसह निवड प्रकारातील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या फेरीत खासगी शैक्षणिक संस्थांमधील १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षक अभियोग्यता चाचणीसाठी २ लाखांहून अधिक उमेदवार प्रविष्ट
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती करण्यासाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. ही परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत पार पडली.
या परीक्षेसाठी एकूण २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला प्रविष्ट झाले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
दरम्यान, १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा दोन्ही निवड प्रकारांतील जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पात्र उमेदवारांकडून ६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले. मुलाखतीसह या निवड प्रकारात तब्बल १ लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते.
मुलाखतीसह फेरीत १० हजार ३२८ पदांसाठी शिफारस
मुलाखतीसह निवड प्रकारात खासगी शैक्षणिक संस्थांच्या एकूण २ हजार ४१६ जाहिराती प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांवर मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे.
पदनिहाय शिफारस झालेल्या उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
पदाचा प्रकार रिक्त पदे शिफारस झालेले उमेदवार
इयत्ता १ ली ते ५ वी १,६०९ ४,४७८
इयत्ता ६ वी ते ८ वी ४,५०५ १०,७९२
इयत्ता ९ वी ते १० वी ४,२१४ ११,८८४
एकूण १०,३२८ २७,१५४
मुलाखती व अध्यापन कौशल्य चाचणी ३ नोव्हेंबरपासून
शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणीची प्रक्रिया ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शासन निर्णय २ एप्रिल २०२६ मधील तरतुदींनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेबाबत संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच निवडीबाबतची माहिती उमेदवार आणि संबंधित व्यवस्थापनांना एसएमएसद्वारेही कळविण्यात येत आहे.
निवडीची स्थिती ऑनलाइन पाहता येणार
उमेदवारांना पवित्र पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या निवडीची सद्यस्थिती तपासता येणार आहे. त्यासाठी उमेदवारांच्या लॉगिनमध्ये निवडीसंबंधीची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळाच्या होमपेजवरील ‘Download’ या पर्यायामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तक्रारींसाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील निवडीसंदर्भात उमेदवारांच्या तक्रारींचे निवारण आणि आवश्यक दुरुस्त्यांसाठी राज्यस्तरावर तक्रार निवारण व दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या तक्रारी विहित प्रपत्रामध्ये edupavitra२०२५grcc@gmail.com या ई-मेलवर ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षक भरतीच्या या प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो बेरोजगार उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून, आता मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणीनंतर अंतिम निवड व नियुक्ती प्रक्रियेकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

