Mahabreaking

[breaking_news]

   Risk of pod borer :तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा धोका; शेतकऱ्यांनो, वेळीच उपाययोजना करा!

Risk of pod borer : तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, मागील काही आठवड्यांपासून कायम असलेले ढगाळ व कोरडे वातावरण तसेच रात्रीच्या वेळी जाणवणारी थंडी यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या किडींच्या प्रादुर्भावामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करून वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

pod borer

  फुलोऱ्यातील तूर वाचवा, उत्पादन टिकवा! कृषी विभागाकडून कीड व्यवस्थापनाचे आवाहन

गजानन तिडके

बुलढाणा : तूर पीक सध्या फुलोरा अवस्थेत असून, मागील काही आठवड्यांपासून कायम असलेले ढगाळ व कोरडे वातावरण तसेच रात्रीच्या वेळी जाणवणारी थंडी यामुळे तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. या किडींच्या प्रादुर्भावामुळे तूर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नियमित पाहणी करून वेळीच एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

तीन प्रकारच्या किडींपासून तूर पिकाला धोका

तूर पिकावर प्रामुख्याने शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा), पिसारी पतंग आणि शेंगमाशी या तीन प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो. हेलिकोव्हर्पा किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले आणि शेंगांवर अंडी घालते. त्यातून बाहेर पडणाऱ्या अळ्या कळ्या व फुले खाऊन पिकाचे नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्या शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे पोखरून खातात.

पिसारी पतंगाची अळी शेंगांची साल खरवडून त्यांना छिद्र पाडते आणि आतील दाण्यांचे नुकसान करते. तर शेंगमाशीची अळी शेंगांच्या आत राहून दाणे अर्धवट कुरतडते. परिणामी दाण्यांची गुणवत्ता खालावते आणि उत्पादनावरही विपरीत परिणाम होतो.

एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी उपाययोजना

शेतकऱ्यांनी तूर पिकामध्ये हेक्टरी २० पक्षी थांबे उभारावेत. यामुळे पक्ष्यांना पिकावरील अळ्या टिपून खाण्यास मदत होते. तसेच घाटे अळीच्या नियंत्रणासाठी हेक्टरी २० कामगंध सापळे लावावेत.

किडींची आर्थिक नुकसान संकेत पातळी ओलांडल्यास तातडीने नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये घाटे अळीचे प्रति सापळा दोन ते तीन दिवसांत ५ ते ६ पतंग आढळणे, प्रति झाड एक अळी आढळणे किंवा ५ ते १० टक्के नुकसान होणे, ही नियंत्रणासाठी लक्ष देण्याची पातळी आहे. पिसारी पतंगाचे १० झाडांमध्ये ५ पतंग आढळणे, तसेच शेंगमाशीमुळे ५ ते १० टक्के दाणे नुकसानग्रस्त होणे, हीदेखील कीड व्यवस्थापनासाठी महत्त्वाची स्थिती आहे.

पहिली फवारणी : ५० टक्के फुलोऱ्यावर

तूर पीक ५० टक्के फुलोऱ्यावर असताना खालीलपैकी कोणत्याही एका पर्यायाची फवारणी करावी, असे कृषी विभागाने सुचविले आहे.

  • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टीन ३०० पीपीएम : १,००० मिली प्रति एकर.
  • अझाडिरॅक्टीन १,५०० पीपीएम : ५०० मिली प्रति एकर.
  • एचएनपीव्ही (१०⁹ पीओबी) : २०० एल.ई. प्रति एकर.
  • बॅसिलस थुरिंजिएन्सिस : ३०० मिली प्रति एकर.
  • क्विनॉलफॉस २५ ईसी : ४०० मिली प्रति एकर.

दुसरी फवारणी : पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी

पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी किडींचा प्रादुर्भाव आणि कृषी विभागाच्या शिफारशीनुसार खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.

  • इमामेक्टिन बेंझोएट ५ एसजी : ६० ग्रॅम प्रति एकर.
  • लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ५ टक्के ईसी : २०० मिली प्रति एकर.
  • इथिऑन ५० टक्के ईसी : ५०० मिली प्रति एकर.
  • क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के एससी : ६० मिली प्रति एकर.
कीटकनाशकांची फवारणी करताना काळजी घ्या

शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी संबंधित उत्पादनाच्या लेबलवरील सूचना, तूर पिकासाठी असलेली नोंदणी आणि शिफारस केलेली मात्रा तपासावी. एकावेळी एकाच पर्यायाचा वापर करावा. फवारणी करताना वैयक्तिक संरक्षण साधनांचा वापर करावा. तसेच मधमाश्या आणि इतर उपयुक्त कीटकांचे संरक्षण होईल, याची विशेष काळजी घ्यावी.

तूर पिकाची नियमित पाहणी, किडींच्या प्रादुर्भावाचे निरीक्षण आणि योग्य वेळी शिफारशीनुसार उपाययोजना केल्यास उत्पादनातील संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचे वेळीच व्यवस्थापन करून पीक सुरक्षित ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top