The Shri Palsiddha Mahaswami Math :दक्षिणेतील उज्जयिनी मठाचे ६० वे जगद्गुरु श्री पलसिद्ध महास्वामी यांनी वीरशैव लिंगायत धर्माची पताका खांद्यावर घेऊन भारतभर भ्रमण केले आणि अखेर साखरखेर्डा नगरीत विसावले. ही भूमी पवित्र असून या मठात सर्वधर्मसमभावाची शिकवण जोपासली जाते. तसेच वीरशैव आणि वारकरी संप्रदायाचा समन्वय व वारसाही येथून पुढे नेला जातो, असे प्रबोधन शि. भ. प. त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांनी आपल्या कीर्तनातून केले.

सर्वधर्मसमभाव जोपासणारे पवित्र स्थान – शि. भ. प. त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांचे प्रबोधन
साखरखेर्डा : दक्षिणेतील उज्जयिनी मठाचे ६० वे जगद्गुरु श्री पलसिद्ध महास्वामी यांनी वीरशैव लिंगायत धर्माची पताका खांद्यावर घेऊन भारतभर भ्रमण केले आणि अखेर साखरखेर्डा नगरीत विसावले. ही भूमी पवित्र असून या मठात सर्वधर्मसमभावाची शिकवण जोपासली जाते. तसेच वीरशैव आणि वारकरी संप्रदायाचा समन्वय व वारसाही येथून पुढे नेला जातो, असे प्रबोधन शि. भ. प. त्र्यंबक स्वामी नंदगावकर यांनी आपल्या कीर्तनातून केले.
साखरखेर्डा येथील श्री पलसिद्ध महास्वामी मठात सात दिवसीय शिवमहापुराण कथांचे आयोजन करण्यात आले असून, २३ मे रोजी रात्री त्र्यंबक स्वामी यांनी कीर्तन सेवा समर्पित केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, या मठाचे जगद्गुरु लक्ष्मण शिवाचार्य महाराज यांनी मठाचा इतिहास, परिसर आणि श्री पलसिद्ध महास्वामी यांच्या कार्याची माहिती संकलित करून ती समाजासमोर मांडली. त्यामुळे श्री पलसिद्ध महास्वामी यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व जगासमोर आले.
ते पुढे म्हणाले की, शिवाचार्यरत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज मठाधिपती झाल्यानंतर त्यांनी मठाचा कायापालट केला. महाराष्ट्रातील २४ मठांचे मुख्य केंद्र म्हणून साखरखेर्डा मठाची ओळख असून, या मठाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर आहे. येथे अनेक विद्यार्थ्यांना धर्मसंस्कारांसह शिक्षणाचीही व्यवस्था उपलब्ध करून दिली जाते. या मठातून घडलेले युवक समाजाला दिशा देण्याचे आणि मार्गदर्शन करण्याचे कार्य करीत आहेत.
मठात ऐक्याची भावना जोपासली जाते तसेच सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली जाते. “हे मंदिर सर्वांसाठी खुले असून, येथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. हे ठिकाण ऐक्य आणि सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
जगणारा, जगविणारा आणि जागृत करणारा हे तिन्ही घटक समाजजीवनात महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी संतपरंपरेचे महत्त्व विषद केले. महाराष्ट्राला संतांची समृद्ध परंपरा लाभली असून, आई-वडील आणि संत हेच खऱ्या अर्थाने मानवाचे हित जपणारे असतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. वाल्या कोळी आणि नारदमुनी यांच्या कथेद्वारे त्यांनी उपस्थितांना अध्यात्मिक व सामाजिक संदेश दिला.
या भव्य मठाची परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्यावर सोपविली असून, ते विविध ठिकाणी जाऊन धर्मप्रसाराचे कार्य करीत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.यावेळी विचारपीठावर सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज उपस्थित होते.

