Sanatan Kawad : साखरखेर्डा येथील सनातन हिंदू युवकांनी यावर्षी प्रयागराज येथून पवित्र जल आणून कावड यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी साखरखेर्डा नगरीत भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये जलाभिषेक करण्यात येणार असून भक्ती आणि श्रद्धेचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे.

भव्य मिरवणूक काढून विविध मंदिरांत जलाभिषेक; भक्ती आणि श्रद्धेचा होणार जागर
साखरखेर्डा : साखरखेर्डा येथील सनातन हिंदू युवकांनी यावर्षी प्रयागराज येथून पवित्र जल आणून कावड यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २४ ऑगस्ट रोजी श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी साखरखेर्डा नगरीत भव्य कावड यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिरांमध्ये जलाभिषेक करण्यात येणार असून भक्ती आणि श्रद्धेचा सुरेख संगम अनुभवायला मिळणार आहे.
प्रयागराज येथून २४ जुलै रोजी निघालेली ही सनातन कावड यात्रा तब्बल १ हजार ८ किलोमीटरचा पायी प्रवास करून २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता साखरखेर्डा येथे दाखल होणार आहे. भोगावती नदीवरील श्री महाकालेश्वर मंदिर परिसरात कावड यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे.
त्यानंतर वाजत-गाजत कावड मिरवणूक काढण्यात येणार असून गणपती चौक, गुजरी चौक, दगडी मस्जिद, श्री पलसिद्ध महास्वामी मठ, बसस्थानक परिसर मार्गे हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह नगर येथे मिरवणुकीचा समारोप होणार आहे. या मार्गावरील विविध मंदिरांमध्ये जलाभिषेक करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कावड यात्रेने २२ ऑगस्ट रोजी कोलारा येथील विदेही कै. रामभाऊ महाराज यांच्या मठात मुक्काम केला होता. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी मोहखेड येथे मुक्काम करून २४ ऑगस्ट रोजी यात्रा साखरखेर्डा येथे दाखल होणार आहे.
या कावड यात्रेचे नेतृत्व ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष जिवणसिंग राजपूत, माजी उपसरपंच रामदाससिंग राजपूत, उपसरपंच संग्रामसिंह राजपूत, बादलसिंग राजपूत, इंद्रपालसिंग राजपूत, पिल्लू ठाकूर आणि आशिष कामे करीत आहेत. कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होणार असून यात्रेच्या माध्यमातून भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यात येणार आहे.

