The Panjra-Kakaddara road : शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विकासाच्या नवनव्या योजना डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळेच चित्र दाखवत आहे. विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे विदारक वास्तव समोर येत असून, विदर्भातील दुर्गम भाग असलेल्या आर्वी तालुक्यातील पांजरा ते काकडदरा हा डांबरी रस्ता याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

रोहना : शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विकासाच्या नवनव्या योजना डिजिटल माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवल्या जात असल्या, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळेच चित्र दाखवत आहे. विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे विदारक वास्तव समोर येत असून, विदर्भातील दुर्गम भाग असलेल्या आर्वी तालुक्यातील पांजरा ते काकडदरा हा डांबरी रस्ता याचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.
पांजरा ते काकडदरा दरम्यानचा डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता सध्या पूर्णतः उखडलेला असून, तो अक्षरशः खडीकरण अवस्थेत पोहोचला आहे. या रस्त्यावरून दररोज ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र खड्डे, उखडलेले डांबर आणि दगडधोंडे पसरले असल्याने अपघाताची भीती कायम आहे.
या खराब रस्त्यामुळे अनेक नागरिकांना कंबरदुखी, पाठदुखी यांसारख्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत असून, वाहनांच्या दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागत असल्याने नागरिकांना नाहक आर्थिक फटकाही बसत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी, रुग्ण, महिला व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, काकडदरा गावाने सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित २०१७ च्या ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यस्तरीय बक्षीस पटकावून संपूर्ण राज्यातच नव्हे, तर देशभरात आपली ओळख निर्माण केली होती. मात्र, अशा आदर्श गावातील नागरिकांनाच तालुक्याच्या ठिकाणी, बाजारपेठेत किंवा दैनंदिन कामांसाठी प्रवास करताना मोठ्या यातना सहन कराव्या लागत आहेत.
या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन पांजरा–काकडदरा रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. अन्यथा संतप्त ग्रामस्थ आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याची शक्यता नाकारता येत नाही.

