Anusayabai Kharat : साखरखेर्डा परिसरातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यकर्ते कै. आत्माराम बापू खरात यांच्या कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी कै. अनुसयाबाई आत्माराम खरात यांचे २४ ऑक्टोबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिंदी येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.

आत्माराम बापूंच्या सामाजिक-राजकीय वाटचालीतील खंबीर साथ हरपली; अनुसयाबाईंना भावपूर्ण श्रद्धांजली
अशोक इंगळे
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरातील ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक कार्यकर्ते कै. आत्माराम बापू खरात यांच्या कार्यात खंबीर साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी कै. अनुसयाबाई आत्माराम खरात यांचे २४ ऑक्टोबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता शिंदी येथील त्यांच्या राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे.
साखरखेर्डा परिसरातील राजकीय व सामाजिक क्षेत्रात कै. आत्माराम बापू खरात यांचे नाव आदराने घेतले जात असे. काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. पांढरी टोपी, शुभ्र शर्ट आणि धोतर हा त्यांचा साधा पेहराव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख बनला होता. शिंदी गावाचे सरपंच म्हणून त्यांनी तब्बल १५ वर्षे काम पाहिले. या काळात गावाच्या विकासासाठी त्यांनी विविध कामे केली. आणीबाणीच्या काळात कारावास भोगावा लागला, तरीही त्यांनी काँग्रेस पक्षाशी असलेली निष्ठा कायम ठेवली.
१९७९ ते १९९१ या काळात जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असताना त्यांनी परिसरातील रस्ते आणि शैक्षणिक सुविधांच्या विकासासाठी योगदान दिले. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. दीर्घ राजकीय कारकिर्दीत स्वच्छ प्रतिमा जपण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना त्यांच्या प्रत्येक वाटचालीत अनुसयाबाईंनी त्यांना मोलाची साथ दिली.
गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी पुढाकार
कै. आत्माराम बापू खरात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष असताना गावातील वाद आणि तंटे गावातच सामोपचाराने मिटविण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात साखरखेर्डा पोलीस ठाण्यात तक्रारी येण्याचे प्रमाण कमी राहिल्याचे सांगितले जाते. या कार्याची दखल घेत त्यांना सिंदखेडराजा तालुक्यातील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
अनुसयाबाई खरात यांनीही सामाजिक आणि सहकार क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविला. सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेनंतर त्या महिला संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. ग्रामसेवा सहकारी सोसायटीसह विविध सहकारी संस्थांमध्ये त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळल्या.
पतीची अखेरपर्यंत सेवा; कुटुंबाचा सामाजिक वारसा पुढे
वयोमानानुसार २३ नोव्हेंबर २०२२ रोजी कै. आत्माराम बापू खरात यांचे निधन झाले. पतीच्या शेवटच्या श्वासापर्यंत अनुसयाबाईंनी त्यांची सेवा केली. पतीच्या निधनानंतरही त्यांनी कुटुंबाची जबाबदारी सांभाळत सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
खरात घराण्याचा सामाजिक आणि राजकीय वारसा पुढे सुरू राहावा, यासाठी त्यांनी पुत्र अशोक खरात यांना राजकीय व सामाजिक कार्याचे धडे दिले. त्यांच्या सूनबाई सौ. साधना अशोक खरात या सध्या शिंदी ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून १५ वर्षे काम केले असून, दोन वेळा सरपंचपदाची जबाबदारीही सांभाळली आहे. कोरोना काळात अशोक खरात यांनी रास्त भाव दुकानाच्या माध्यमातून नागरिकांना धान्यपुरवठा करण्याचे काम केले.
अनुसयाबाईंच्या निधनाने खरात कुटुंबीयांसह शिंदी गावातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत ग्रामस्थांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कै. अनुसयाबाई खरात यांच्या अंत्यसंस्कारावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, आमदार मनोज कायंदे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गिते, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंडारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

