Mahabreaking

[breaking_news]

Prataprao Jadhav:दुष्काळग्रस्त शेतकरी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीर; प्रतापराव जाधव यांची ग्वाही

Prataprao Jadhav: दुष्काळाच्या संकटात शेतकरी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. दिव्यांग बांधवांना स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

Prataprao Jadhav

सेवा सप्ताहातून दिव्यांगांच्या जीवनात स्वावलंबनाचा नवा प्रकाश; ७०३ लाभार्थ्यांना ८० लाखांचे साहित्य वाटप

गजानन तिडके 

बुलढाणा : दुष्काळाच्या संकटात शेतकरी, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. दिव्यांग बांधवांना स्वाभिमानाने आणि स्वावलंबीपणे जीवन जगता यावे, यासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आवश्यक ते सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.

Prataprao Jadhav

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताहा’अंतर्गत दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यभूत साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या हस्ते ७०३ लाभार्थ्यांना सुमारे ८० लाख रुपये किमतीच्या सहाय्यभूत साहित्याचे वितरण करण्यात आले. यामध्ये बॅटरीवर चालणाऱ्या तीनचाकी गाड्या, व्हीलचेअर, मोबाईल बंद काठ्या आदी साहित्याचा समावेश होता.

यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे बुलढाण्यासह विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रब्बी हंगामही अडचणीत आला आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी हतबल न होता धैर्याने परिस्थितीचा सामना करावा. केंद्र व राज्य शासनासह सर्व लोकप्रतिनिधी शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, अशी ग्वाही प्रतापराव जाधव यांनी दिली.

दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन यंदाचा वाढदिवस जल्लोषात किंवा खर्चिक पद्धतीने साजरा न करता समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि मित्रपरिवाराला अनावश्यक खर्च टाळून गरजू नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार संपूर्ण आठवडाभर जिल्ह्यात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यात सुमारे १५ आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, रक्तदान शिबिरे, गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप असे उपक्रमही राबविण्यात येत आहेत.

राष्ट्रपतींच्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय आरोग्य तपासणी शिबिरात अनेक दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली होती. या तपासणीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पहिल्या यादीतील २ हजार ४६७ आणि दुसऱ्या यादीतील ४४२ अशा एकूण २ हजार ९०९ दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार सहाय्यभूत साहित्य उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या साहित्यामुळे दिव्यांग व्यक्तींना दैनंदिन कामे अधिक सुलभतेने करता येणार असून, त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होणार आहे.

दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य मिळविण्यासाठी यापूर्वी नागपूर येथे जावे लागत होते. जिल्ह्यातील अनेक दिव्यांग व्यक्तींना आर्थिक परिस्थिती आणि प्रवासाच्या अडचणींमुळे ते शक्य होत नव्हते. ही अडचण लक्षात घेऊन बुलढाणा जिल्ह्यातच दिव्यांग साहित्य तपासणी व वितरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रामुळे तज्ज्ञांकडून तपासणी करून गरजेनुसार आवश्यक साहित्य जिल्ह्यातच उपलब्ध करून देण्याची सुविधा निर्माण झाली आहे. शेजारील जिल्ह्यांतील दिव्यांग व्यक्तींनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजात ज्येष्ठ नागरिकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या अनुभवातून अनेक समस्यांवर मार्ग निघू शकतो. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि आधाराने जीवन जगता यावे, यासाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही प्रतापराव जाधव यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्व लाभार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा योग्य वापर करून स्वावलंबी जीवन जगण्याचे आवाहन केले. भविष्यातही आवश्यक साहित्य किंवा मदतीची गरज भासल्यास संपर्क साधावा. शासन आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आवश्यक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top