Youth Festival : युवकांच्या कलागुणांना वाव देणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि मेरा युवा भारत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.

युवकांच्या कलागुणांना मिळणार हक्काचे व्यासपीठ; २६ नोव्हेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव
बुलढाणा : युवकांच्या कलागुणांना वाव देणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे तसेच राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बुलढाणा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा आणि मेरा युवा भारत कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे.
यंदाच्या महोत्सवाची ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ ही संकल्पना असून, त्याअंतर्गत विविध कला व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. जानेवारी २०२७ मध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, पथनाट्य, चित्रकला आणि कविता लेखन अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या माध्यमातून युवक-युवतींना आपली कला, प्रतिभा आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे. स्पर्धांमधील विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
या महोत्सवात १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. इच्छुकांनी संस्थेच्या लेटरहेडवर प्रवेश नोंदणी करून ती dsobld@gmail.com या ई-मेलवर पाठवावी. तसेच स्पर्धेच्या प्रवेशिका क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे यांच्याकडे जमा कराव्यात. अधिक माहितीसाठी ९७६४७३२७६४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी या महोत्सवात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे आणि मेरा युवा भारतच्या समन्वयक दीक्षा पोमण यांनी केले आहे.

