Mahabreaking

[breaking_news]

The Deulgaon Mahi-Isrul road :देऊळगाव मही–इसरुळ रस्ता गेला खड्ड्यात; डांबरीकरणासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

The Deulgaon Mahi-Isrul road : देऊळगाव मही ते इसरुळ या महत्त्वाच्या दळणवळण मार्गाची अवस्था गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत दयनीय असून, या रस्त्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी दिनांक ९ जानेवारी रोजी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.

The Deulgaon Mahi-Isrul road

विठ्ठल पान्नासे

देऊळगाव मही : देऊळगाव मही ते इसरुळ या महत्त्वाच्या दळणवळण मार्गाची अवस्था गेल्या दहा वर्षांपासून अत्यंत दयनीय असून, या रस्त्याकडे सत्ताधारी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी दिनांक ९ जानेवारी रोजी संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले.

हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय झाला असून मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि पावसाळ्यात साचणारा चिखल यामुळे सर्वसामान्य नागरिक, वाहनचालक व शेतकरी हैराण झाले आहेत. दर निवडणुकीत आश्वासनांची खैरात वाटली जाते; मात्र निवडणुका संपताच हा रस्ता पुन्हा दुर्लक्षित राहतो, अशी तीव्र नाराजी ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात शेतमालाची वाहतूक होत असते. मात्र खराब रस्त्यामुळे शेतमाल बाजारपेठेत पोहोचवण्याचा खर्च वाढला असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. “हा रस्ता म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या विकासाच्या दाव्यांची पोलखोल आहे. गेल्या अनेक वर्षांपासून निवेदने देऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया संघटनेचे पदाधिकारी मधुकर शिंगणे यांनी व्यक्त केली.

प्रशासनाच्या निष्क्रियतेवर बोट ठेवत त्यांनी सांगितले की, शेतकरी संकटात असताना लोकप्रतिनिधी केवळ फोटोसेशन व आश्वासनांपुरते मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे आता केवळ निवेदनांवर विश्वास न ठेवता रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, अशी भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.

प्रशासनाने तातडीने उपाययोजना न केल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवीकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
“देऊळगाव मही–इसरुळ रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण न झाल्यास शेतकरी, ग्रामस्थ व वाहनचालकांना एकत्र करून मोठे आंदोलन उभारले जाईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल,” असा थेट इशारा संघटनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आला आहे.

या निवेदनावर मधुकर शिंगणे, शेख जुल्फेकार, गजानन वायाळ, विठोबा नागरे, वसंतराव पाटील, प्रवीण राऊत, पुरुषोत्तम शिंगणे यांच्यासह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विकासाच्या घोषणा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आता तरी प्रत्यक्ष काम करून दाखवावे, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरून जाब विचारतील, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top