Reservation : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

बुलढाणा : राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.
संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रांत आरक्षण सोडतीसंबंधी सूचना प्रसिद्ध करतील.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध होईल. त्यावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्राप्त हरकतींचा विचार करून ३ नोव्हेंबर २०२५ रोजी शासन राजपत्रात अंतिम आरक्षण प्रसिद्ध केले जाईल.
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रारूप मतदार यादीची ८ ऑक्टोबरला प्रसिद्धी
राज्यातील २४७ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सदस्यपद आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर १३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाईल.प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी जाहीर केली जाईल.
मतदार यादीत दुरुस्तीबाबत महत्त्वाची माहिती
प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदारांची नावे व पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश, नावे वगळणे अथवा नावे-पत्त्यांमध्ये दुरुस्ती करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही.तथापि, प्रभाग विभाजन करताना लेखनिकांकडून झालेल्या चुका, मतदाराचा प्रभाग बदलणे, विधानसभा यादीत नाव असूनही प्रभाग यादीत नाव नसणे अशा त्रुटींवर मतदारांना हरकती व सूचना दाखल करण्याची संधी राहणार आहे.

