Mahabreaking

[breaking_news]

election of the Sarpanch : २७ ग्रामपंचायतींमध्ये रंगणार थेट सरपंच निवडीचा रणसंग्राम

election of the Sarpanch : संग्रामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या राजकीय निर्णयानुसार थेट सरपंच निवड लागू झाल्याने तालुक्यातील गावागावात राजकीय वातावरण तापू लागले आहे.

election

 फेब्रुवारीमध्ये संपतेय मुदत, संग्रामपूर तालुक्यात राजकीय हालचालींना आला वेग

संग्रामपूर : संग्रामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची मुदत येत्या फेब्रुवारी महिन्यात संपत असून, या सर्व ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारच्या राजकीय निर्णयानुसार थेट सरपंच निवड लागू झाल्याने तालुक्यातील गावागावात राजकीय वातावरण तापू लागले आहे.

थेट सरपंच निवडणूक ही पूर्णतः सरपंचकेंद्रित असल्याने इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. स्थानिक पातळीवर राजकीय गट सक्रिय झाले असून, संभाव्य उमेदवार, कार्यकर्ते आणि पक्षीय नेत्यांच्या बैठका, भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे ग्रामपातळीवर आगामी निवडणुकीचे पडसाद स्पष्टपणे उमटू लागले आहेत.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपणार
तालुक्यातील आवार, कोद्री, उकळी, वरवट खंडेराव, पातुर्डा बु., वरवट बकाल, बोडखा, वानखेड, दुर्गादैत्य, कवठळ, खिरोडा, सोनाळा, सगोडा, पळसोडा, काकनवाडा खुर्द, पिप्री, आडगाव, अकोली, चांगेफळ, रुधाणा, निरोड, तामगाव, पळशी, झाशी, बावनबीर, टुनकी, लाडनापूर, वसाडी व आलेवाडी या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपत आहे.

आरक्षण जाहीर; पुढील समीकरणांकडे लक्ष
या सर्व ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाचे आरक्षण सहा महिन्यांपूर्वीच जाहीर करण्यात आले आहे. मात्र, वार्डनिहाय आरक्षण अद्याप जाहीर झालेले नसल्याने अनेक इच्छुकांची प्रतीक्षा कायम आहे. वार्ड आरक्षण जाहीर होताच राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होणार असून, उमेदवारीसाठीची चढाओढ वाढण्याची शक्यता आहे.

मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये अटीतटीच्या लढतीची चिन्हे
लोकसंख्येने मोठ्या असलेल्या सोनाळा, वानखेड, वरवट बकाल व पातुर्डा या ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक विशेष गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ठिकाणी सरपंचपदासाठी सत्ताधारी व विरोधी गटांमध्ये जोरदार तयारी सुरू असून, आगामी काळात थेट राजकीय संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मतदार यादी दुरुस्ती युद्धपातळीवर
निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून मतदार यादी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे आगामी काही आठवड्यांत संग्रामपूर तालुक्यातील ग्रामीण राजकारण अधिक तापणार, हे निश्चित मानले जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top