TET candidates : शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ चे आयोजन येत्या २८ जून रोजी करण्यात आले असून बुलढाणा शहर व परिसरातील २२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानंतर सेवेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठीही टीईटी पात्रता आवश्यक ठरल्याने या परीक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

२८ जूनला टीईटी परीक्षा; आधारकार्ड, प्रवेशपत्र आणि नियम जाणूनच घराबाहेर पडा
बुलढाणा : शिक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ चे आयोजन येत्या २८ जून रोजी करण्यात आले असून बुलढाणा शहर व परिसरातील २२ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्णयानंतर सेवेतील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांसाठीही टीईटी पात्रता आवश्यक ठरल्याने या परीक्षेचे महत्त्व अधिक वाढले आहे.
यावर्षी पेपर-१ (इयत्ता १ ली ते ५ वी) साठी ५ हजार ९५३ तर पेपर-२ (इयत्ता ६ वी ते ८ वी) साठी ७ हजार १७४ असे एकूण १३ हजार १२७ परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा पारदर्शक व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने विशेष उपाययोजना केल्या आहेत.
परीक्षार्थ्यांची परीक्षा केंद्रावर आधार बायोमेट्रिक पडताळणी व फ्रीस्किंग करण्यात येणार आहे. त्यामुळे पेपर-१ साठी सकाळी ८.३० वाजेपर्यंत तर पेपर-२ साठी दुपारी १२.३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रासाठी १०.१० वाजल्यानंतर आणि दुपारच्या सत्रासाठी २.१० वाजल्यानंतर कोणत्याही परीक्षार्थ्याला केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
परीक्षेला जाताना प्रवेशपत्रासह आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र आणि त्याची सत्यप्रत सोबत बाळगणे बंधनकारक आहे. प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले असून परीक्षार्थ्यांनी ते वेळेपूर्वी डाउनलोड करून ठेवावे.
परीक्षा केंद्रात मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, डिजिटल घड्याळ, पेजर, ब्लूटूथ उपकरणे, इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तसेच कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिव्यांग परीक्षार्थ्यांसाठी लेखनिकाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. लेखनिक हा बारावीपेक्षा अधिक शिक्षित नसावा, त्याचे वय १९ वर्षांपेक्षा कमी असावे आणि तो परीक्षार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नसावा, अशी अट घालण्यात आली आहे. परीक्षा केंद्रावर ऐनवेळी लेखनिकास परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परीक्षार्थ्यांनी शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी आपले परीक्षा केंद्र, त्याचा पत्ता आणि प्रवासाची व्यवस्था आगाऊ निश्चित करून ठेवावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी केले आहे.

