Mahabreaking

[breaking_news]

Teachers constituency election:  शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला रंगत; चौघांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणांना वेग

Teachers constituency election: विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला आता राजकीय रंग चढू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी, शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी चार उमेदवारांनी चार नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या सहा झाली आहे. अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार ही निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असून, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

Teachers

 अमरावती शिक्षक मतदारसंघात उमेदवारीचा धडाका; वंचितसह अपक्षांचीही मैदानात एन्ट्री

अमरावती  : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला आता राजकीय रंग चढू लागला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी, शनिवार दि. ३ ऑक्टोबर रोजी चार उमेदवारांनी चार नामनिर्देशनपत्रे दाखल केली. त्यामुळे आतापर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या सहा झाली आहे. अधिकृत निवडणूक कार्यक्रमानुसार ही निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असून, मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाने निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध केला आहे.

आज अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अशोक वामन हिवाळे (अपक्ष), दिलीप भीमराव कडू (अपक्ष), गाजी मोहम्मद जाहेरोश (वंचित बहुजन आघाडी) आणि आशिष मनोहर अंबुलकर (अपक्ष) यांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत असून, येत्या काळात आणखी कोणते उमेदवार मैदानात उतरतात, याकडे शिक्षक मतदारांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, आज सात व्यक्तींनी १५ नामनिर्देशनपत्रे उचलली आहेत. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्जांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

उमेदवारांचे वेट अँड वॉच, दोन दिवसात उमेदवारी अर्जांची संख्या वाढणार

निवडणूक कार्यक्रमानुसार मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर बुधवार, दि. ७ ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून, कोणते उमेदवार अंतिम रिंगणात राहतात, हे ९ ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार आहे. येत्या सोमवार आणि मंगळवारी उमेदवारी अर्जांची संख्या वाढणार आहे.

२३ ऑक्टोबरला मतदान

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर मंगळवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

रविवारी अर्ज प्रक्रिया बंद

रविवार, दि. ४ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असल्याने नामनिर्देशनपत्रांची उचल तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया होणार नाही, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तिक रजा

दरम्यान, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी शिक्षक मतदारांना विशेष नैमित्तिक रजा जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.

लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ मधील कलम १३५-बनुसार मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवश्यक सवलत देण्याची तरतूद आहे. त्यानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना विशेष नैमित्तिक रजा देण्यात आली आहे.

मात्र, खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक मतदारांना ही विशेष नैमित्तिक रजा लागू होणार नाही. अशा मतदारांना मतदान करता यावे यासाठी संबंधित खासगी आस्थापनांनी त्यांच्या स्तरावरून दोन तासांची विशेष सवलत देण्याबाबत आवश्यक सूचना करण्याचे कळविण्यात आले आहे.

मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदारांनी मतदानाचा हक्क प्राधान्याने बजावावा, असे आवाहन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी नयना गुंडे यांनी केले आहे.

अर्ज दाखल करण्यासाठी आता अंतिम मुदत जवळ आली असून, त्यानंतर छाननी व माघारीच्या प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या पुढील टप्प्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top