Students receive training : जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र, कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, या शिबिरात शिक्षक माधव जऊळकर यांचे विशेष योगदान ठरत आहे.

शिक्षक माधव जऊळकर यांनी २०० खेळाडूंना स्वखर्चाने दिले बूट
बोरगाव मंजू : जय बजरंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच जय बजरंग व्यायाम शाळा केंद्र, कुंभारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहा दिवसीय ग्रीष्मकालीन निवासी शिबिरात विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येत असून, या शिबिरात शिक्षक माधव जऊळकर यांचे विशेष योगदान ठरत आहे.
“गुरुविना ज्ञान नाही” या उक्तीप्रमाणे शिक्षक केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण घडविण्याचे कार्य करतात. शिक्षक माधव जऊळकर यांनीही आपल्या अंगी असलेल्या विविध कलांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. संगीत, बासरीवादन, गायन, अभिनय यांसह विविध कलांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या जऊळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांना प्रोत्साहित केले आहे.शिबिरादरम्यान विद्यार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची असते, याचे उत्तम उदाहरण माधव जऊळकर यांच्या कार्यातून दिसून येते.विशेष म्हणजे, रखरखत्या उन्हात प्रशिक्षण घेणाऱ्या सुमारे २०० खेळाडू विद्यार्थ्यांना माधव जऊळकर यांनी स्वखर्चातून बूट उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सेवाभाव यातून त्यांनी मानवतेचा आदर्श संदेश दिला आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिबिराचे आयोजक व मार्गदर्शक प्रकाशभाऊ बिडकर, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीकृष्ण बिडकर गुरुजी, प्राचार्य डॉ. सूर्यभान नागुलकर, मुख्याध्यापक दिनकर धामणकर, प्रा. श्रीराम पालकर आदी मान्यवरांच्या हस्ते शिक्षक माधव जऊळकर यांचा सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेले शिक्षक माधव जऊळकर यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

