Give 46 thousand: शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवणकाम प्रशिक्षणाच्या देयकासाठी तब्बल ४६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी चिंचोली गणू (ता. बाळापूर) येथील तत्कालीन सरपंच तथा सध्या प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या वनमाला कैलास वाघ आणि त्यांचे पती कैलास डिगांबर वाघ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचोली गणू ग्रामपंचायतीतील प्रकरण उजेडात; सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अकोला : शासनाच्या १५ व्या वित्त आयोगांतर्गत महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवणकाम प्रशिक्षणाच्या देयकासाठी तब्बल ४६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी चिंचोली गणू (ता. बाळापूर) येथील तत्कालीन सरपंच तथा सध्या प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या वनमाला कैलास वाघ आणि त्यांचे पती कैलास डिगांबर वाघ यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार हे चिंचोली गणू येथील ‘अथांग बहुउद्देशीय संस्था’चे सचिव आहेत. सन २०२४-२५ मध्ये १५ व्या वित्त आयोगाच्या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत चिंचोली गणूने महिलांसाठी तीन दिवसीय शिवणकाम प्रशिक्षण आयोजित करण्याचा कार्यारंभ आदेश संस्थेला दिला होता. या प्रशिक्षणासाठी ६६ हजार ७०० रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
संस्थेने ५ जून ते ७ जून २०२५ या कालावधीत महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण दिल्यानंतर संबंधित खर्चाचे ६६ हजार ७०० रुपयांचे देयक ग्रामपंचायतीकडे सादर केले होते. मात्र हे देयक मंजूर करून देण्यासाठी आरोपींनी ४६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ९ एप्रिल २०२६ रोजी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर अकोला येथील मुख्य बसस्थानकाजवळील सदाबहार हॉटेलमध्ये लाच मागणी पडताळणी कारवाई करण्यात आली. या पडताळणीदरम्यान वनमाला वाघ यांनी ४६ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे तसेच तडजोडीनंतर २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाल्याचे एसीबीने म्हटले आहे. तसेच कैलास वाघ यांनी लाच व्यवहारात मध्यस्थी करत तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात ११ एप्रिल आणि २३ एप्रिल २०२६ रोजी दोन वेळा सापळा कारवाई राबविण्यात आली. मात्र तक्रारदाराच्या हालचालींबाबत संशय आल्याने आरोपींनी प्रत्यक्ष लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे लाच रक्कम स्वीकारली गेली नसली तरी लाच मागणी व व्यवहाराला प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई अॅन्टी करप्शन ब्युरो अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे आणि अकोला येथील पोलीस उपअधीक्षक मिलिंदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक अतुल इंगोले यांनी पथकाचे नेतृत्व केले. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने काम करून देण्यासाठी लाचेची मागणी झाल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

