Strong opposition : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या खामगाव विभागीय कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्षिक आढावा व मार्गदर्शक बैठक रविवारी (२ ऑगस्ट) खामगाव येथील पतसंस्था कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत विद्युत क्षेत्रातील खाजगीकरण आणि प्रस्तावित फ्रेंचायझी धोरणाविरोधात संघटनेने तीव्र भूमिका घेत कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेची विभागीय बैठक उत्साहात; कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी तीव्र लढ्याचा निर्धार
खामगाव : महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या खामगाव विभागीय कार्यकारिणीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्षिक आढावा व मार्गदर्शक बैठक रविवारी (२ ऑगस्ट) खामगाव येथील पतसंस्था कार्यालयात उत्साहात पार पडली. बैठकीत विद्युत क्षेत्रातील खाजगीकरण आणि प्रस्तावित फ्रेंचायझी धोरणाविरोधात संघटनेने तीव्र भूमिका घेत कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष अमर गवारगुरू होते. तर परिमंडळ अध्यक्ष पृथ्वीराज वानखडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.
प्रारंभी विभागीय सचिव महादेव हळम यांनी गेल्या वर्षभरात संघटनेने राबविलेल्या विविध संघटनात्मक उपक्रमांचा सविस्तर आढावा सादर केला. तसेच आगामी काळातील संघटनेची उद्दिष्टे, कार्यपद्धती आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी बोलताना परिमंडळ अध्यक्ष पृथ्वीराज वानखडे तसेच विनोद गवई यांनी राज्यातील विद्युत क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या फ्रेंचायझी धोरणावर तीव्र टीका केली. या धोरणामुळे सामान्य वीज ग्राहकांसह विद्युत कर्मचाऱ्यांचे, विशेषतः मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे आर्थिक व प्रशासकीय शोषण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. सरकारने प्रस्तावित फ्रेंचायझी धोरण मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
बैठकीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, पदोन्नतीमधील आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी, प्रलंबित प्रश्नांचा तातडीने निपटारा तसेच संघटनात्मक एकता अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांनी संघटित राहून आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष अधिक प्रभावीपणे सुरू ठेवावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.
या बैठकीला मंडळ सचिव उमेश गावंडे, पतसंस्था अध्यक्ष अविनाश भागवत, विभागीय उपाध्यक्ष विजय दांडगे, सहसचिव सतीश निंबाळकर, संघटक सोपान गावंडे, विजय मोहिंदे, राम डुकरे यांच्यासह खामगाव विभागातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या आगामी दिशा-नियोजनावर चर्चा करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांसाठी संघटना अधिक संघटित व आक्रमकपणे काम करणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

