Impressive performance: अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ऑल इंडिया नरेंद्र फिरदोईया चषक क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत शारदा ज्ञानपीठचा विद्यार्थी प्रद्यून्य सतीश मुळे याने उल्लेखनीय कामगिरी करत 1505 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ (FIDE) रेटिंग प्राप्त केली आहे. त्याच्या या यशामुळे शारदा ज्ञानपीठच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

शारदा ज्ञानपीठचा विद्यार्थी प्रद्यून्य मुळे ठरला ‘रेटेड’ बुद्धिबळपटू; आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकली प्रतिभा
बुलढाणा : अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या ऑल इंडिया नरेंद्र फिरदोईया चषक क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत शारदा ज्ञानपीठचा विद्यार्थी प्रद्यून्य सतीश मुळे याने उल्लेखनीय कामगिरी करत 1505 आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ (FIDE) रेटिंग प्राप्त केली आहे. त्याच्या या यशामुळे शारदा ज्ञानपीठच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अहिल्यानगर येथे 17 जुलैपासून आयोजित करण्यात आलेल्या या तीन दिवसीय स्पर्धेत देशभरातील सुमारे साडेतीनशे बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत शारदा ज्ञानपीठमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या प्रद्यून्य सतीश मुळे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत नऊ डावांमध्ये साडेचार गुण मिळविले आणि त्याच्या जोरावर 1505 आंतरराष्ट्रीय रेटिंग मिळविण्याचा मान पटकावला.
प्रद्यून्य हा माईंडचेस अकॅडमीमध्ये नियमित सराव करीत असून, त्याच्या यशामागे अकॅडमीचे प्रशिक्षक अमोल इंगळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सातत्यपूर्ण सराव, चिकाटी आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश संपादन करता आल्याची भावना प्रद्यून्यने व्यक्त केली.
आपल्या यशाचे श्रेय त्याने वडील सतीश मुळे, प्रशिक्षक अमोल इंगळे, शरद नागरे सर, पत्की सर आणि केळकर मॅडम यांना दिले आहे.
प्रद्यून्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शारदा ज्ञानपीठचे शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच बुद्धिबळप्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे. भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही तो अधिक मोठी कामगिरी करेल, असा विश्वास सर्व स्तरातून व्यक्त केला जात आहे.

