Ashadhi Wari : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष बस चालविण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांचे समूह नोंदणी (ग्रुप बुकिंग) झाल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.

वारकऱ्यांसाठी परिवहन महामंडळाची मोठी तयारी; ५,५०० विशेष बसेस, चार तात्पुरती बसस्थानके उभारणार
पंढरपूर : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा ५ हजार ५०० विशेष बस चालविण्याचे नियोजन केले आहे. राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांचे समूह नोंदणी (ग्रुप बुकिंग) झाल्यास त्या गावातून थेट पंढरपूरपर्यंत विशेष एसटी बस उपलब्ध करून दिली जाईल, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
आषाढी यात्रा नियोजनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा बसस्थानक येथे झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके तसेच महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, विशेष बससेवेतही शासनाच्या सर्व प्रवासी सवलती लागू राहतील. ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा, तर ‘महिला सन्मान योजना’ अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत मिळणार आहे. विशेष बसची सुविधा घेण्यासाठी भाविकांनी जवळच्या एसटी आगारात संपर्क साधून आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यात्राकाळात बसस्थानकांवरील स्वच्छता, निर्जंतुकीकरण, मार्गदर्शन फलक, चालक-वाहकांची वैद्यकीय तपासणी आणि परतीच्या प्रवासासाठी स्वतंत्र रांग व्यवस्थापन करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. एकादशीनंतर मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजनबद्ध वाहतूक व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे.
मागील वर्षी आषाढी यात्रेसाठी एसटीने ५,१४५ विशेष बस चालवून सुमारे २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती. यंदा भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अधिक व्यापक नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक नियंत्रणासाठी ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यात येणार आहेत.
वारकरी भाविकांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा (देगाव), विठ्ठल कारखाना आणि पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) येथे चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. या ठिकाणी पिण्याचे पाणी, सुलभ शौचालये, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
यात्राकाळात रात्रंदिवस सेवा बजावणाऱ्या एसटी महामंडळाच्या सुमारे १३ हजार चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी चहा, नाश्ता व भोजनाची व्यवस्था परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने करण्याची घोषणा केली.
बैठकीनंतर मंत्री सरनाईक यांनी देगाव येथील भीमा तात्पुरत्या बसस्थानकाची पाहणी करून स्वच्छता, आरोग्य सुविधा, सीसीटीव्ही व्यवस्था, सुरक्षा, पिण्याचे पाणी आणि प्रवासी सुविधांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यंदाची आषाढी एकादशी २५ जुलै २०२६ रोजी असून, यात्रेदरम्यान १८ ते २० लाख वारकरी आणि भाविक पंढरपुरात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

