continues : ऐन पोळ्याच्या सणादिवशीच डोणगाव परिसरातील एका शेतकऱ्याची दुभती म्हैस अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावासह परिसरात सातत्याने घरफोड्या, शेतातील साहित्य आणि पशुधनाच्या चोऱ्या होत असतानाही चोरट्यांचा ठोस तपास लागत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

पोळ्याचा आनंद हिरावला; डोणगावात शेतकऱ्याची म्हैस चोरीला, वाढत्या चोऱ्यांमुळे भीतीचे वातावरण
डोणगाव : ऐन पोळ्याच्या सणादिवशीच डोणगाव परिसरातील एका शेतकऱ्याची दुभती म्हैस अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गावासह परिसरात सातत्याने घरफोड्या, शेतातील साहित्य आणि पशुधनाच्या चोऱ्या होत असतानाही चोरट्यांचा ठोस तपास लागत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी साहेबराव पळसकर यांनी पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या पशुधनाची तयारी केली होती. मात्र, पोळ्याच्याच दिवशी भल्या पहाटे त्यांच्या गोठ्यातील दुभती म्हैस चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सणाच्या दिवशीच पशुधन चोरीला गेल्याने पळसकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, पोळ्याचा आनंद पूर्णपणे हिरावला गेला आहे.
शेतकऱ्यांच्या पशुधनालाही चोरट्यांचा धोका
गेल्या काही महिन्यांपासून डोणगाव आणि लगतच्या ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. शेतातील विद्युत मोटारी, केबल तसेच अन्य साहित्य चोरीला जाण्याच्या घटनांनंतर आता थेट गोठ्यातील जनावरेही चोरट्यांच्या निशाण्यावर आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
रात्रंदिवस कष्ट करून पशुधनाचे संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेची सुरक्षितता धोक्यात आली असून, वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांच्या तपासाबाबत शेतकऱ्यांमध्ये संताप
म्हैस चोरीप्रकरणी स्थानिक पोलिसांत तक्रार देण्यात आली असली, तरी अद्याप चोरट्यांचा कोणताही सुगावा लागलेला नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिसरात चोऱ्यांच्या घटना वाढत असतानाही पोलिस प्रशासनाकडून अपेक्षित गांभीर्याने तपास होत नसल्याचा आरोप त्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे.
साहेबराव पळसकर यांच्या चोरीला गेलेल्या म्हशीचा तातडीने शोध घेऊन चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अॅड. रामेश्वर पळसकर तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

