Mahabreaking

[breaking_news]

diesel thefts :समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीचे सत्र सुरूच; ११० लिटर डिझेल लंपास

diesel thefts : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी आणि लुटमारीच्या घटना सुरूच असून, वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीबी पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावरील मांडवा येथील चॅनल क्रमांक ३११ वर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर झोपलेल्या चालकाच्या आयशर वाहनातून चोरट्यांनी तब्बल ११० लिटर डिझेल लंपास केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

diesel thefts

 चोरट्यांचा समृद्धी महामार्गावर धुमाकूळ; झोपलेल्या चालकाला गाठून डिझेल चोरी

रमेश खंडागळे

बीबी : समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी आणि लुटमारीच्या घटना सुरूच असून, वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बीबी पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या समृद्धी महामार्गावरील मांडवा येथील चॅनल क्रमांक ३११ वर इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोर झोपलेल्या चालकाच्या आयशर वाहनातून चोरट्यांनी तब्बल ११० लिटर डिझेल लंपास केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद अन्सार हे आयशर मालवाहू वाहन क्रमांक बीआर ०६ जीजी ५१९२ घेऊन रायपूरहून लोखंडी अँगलचा माल घेऊन जालना येथे जात होते. रात्रीच्या प्रवासादरम्यान झोप येत असल्याने त्यांनी पहाटेच्या सुमारास मांडवा येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरील सर्व्हिस रोडवर, चॅनल क्रमांक ३११ जवळ आपले वाहन उभे केले.

वाहन उभे केल्यानंतर चालक मोहम्मद अन्सार हे वाहनात झोपी गेले. पहाटे सुमारे चार ते पाच वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी चालक गाढ झोपेत असल्याचा फायदा घेत आयशरच्या डिझेल टाकीचे झाकण तोडले. त्यानंतर टाकीतील अंदाजे ११० लिटर डिझेल चोरी करून चोरटे पसार झाले.

झोपेतून उठल्यानंतर चालकाच्या हा प्रकार लक्षात आला. डिझेल टाकीचे झाकण तुटलेले दिसून आले, तसेच वाहन उभे असलेल्या रस्त्यावर काही प्रमाणात डिझेल सांडल्याचेही आढळून आले.

तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची चालकांची भावना

समृद्धी महामार्गावर यापूर्वीही डिझेल चोरी, लुटमार आणि वाहनधारकांना लक्ष्य करण्याच्या घटना घडत असल्याने चालकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तक्रार करूनही चोरट्यांचा शोध लागत नाही किंवा चोरी झालेल्या डिझेलची भरपाई मिळत नसल्याची भावना काही वाहनचालक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे अनेक चालक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासही टाळाटाळ करीत असल्याचे सांगण्यात येते.

सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

समृद्धी महामार्गावर वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणा कार्यरत असतानाही चोरीच्या घटना घडत असल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना सुरक्षित ठिकाणी वाहन उभे करण्याची सुविधा, नियमित गस्त आणि संवेदनशील ठिकाणी अधिक कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची गरज वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे.

समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी आणि लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर रात्रीच्या प्रवासादरम्यान वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top