Mahabreaking

[breaking_news]

Suresh Devkar :सुरेश देवकरांच्या रूपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा; कपिल पाटील यांचे आवाहन

Suresh Devkar : “गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे उमटला नाही. आता सभागृहात शिक्षकांचे प्रश्न ठामपणे मांडणारा आमदार मिळवायचा असेल, तर सुरेश देवकर यांच्या रूपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा,” असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते तथा माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले.

Suresh Devkar

शिक्षक भारतीचे उमेदवार सुरेश देवकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल; नामांकन मेळाव्यात परिवर्तनाचा निर्धार

अमरावती : “गेल्या सहा वर्षांत विधान परिषदेत शिक्षकांचा आवाज प्रभावीपणे उमटला नाही. आता सभागृहात शिक्षकांचे प्रश्न ठामपणे मांडणारा आमदार मिळवायचा असेल, तर सुरेश देवकर यांच्या रूपाने शिक्षकांचा आवाज बुलंद करा,” असे आवाहन शिक्षक भारतीचे नेते तथा माजी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी केले.

Suresh Devkar

शिक्षक भारतीचे अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील अधिकृत उमेदवार सुरेश गिताबाई बाबुराव देवकर यांनी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या नामांकन मेळाव्यात कपिल पाटील बोलत होते.

यावेळी शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, संदिप तडस यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सभागृहात शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलणारा माणूस हवा’

कपिल पाटील म्हणाले, “विधान परिषदेत सात शिक्षक आमदार आहेत. मात्र, सभागृहाच्या नोंदी पाहिल्या तर अनेकजण गप्प राहिल्याचे दिसते. गरिबांच्या शिक्षणाच्या बाजूने ठामपणे उभे राहण्याची बांधिलकी महत्त्वाची आहे. जाती-धर्माचा गर्व करण्यापेक्षा आपण गरिबांच्या बाजूने उभे आहोत, हे महत्त्वाचे आहे. सभागृहात शिक्षकांच्या प्रश्नांवर बोलणारा माणूस हवा.”

विदर्भाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बी. टी. देशमुख यांनी सभागृहात एकटे असतानाही प्रभावी भूमिका बजावली होती. हीच परंपरा पुढे नेण्याची गरज असल्याचेही कपिल पाटील यांनी नमूद केले.

‘देवकरांच्या प्रचारफलकावर सावित्रीबाई फुले, फातिमा शेख’

सध्याच्या निवडणूक प्रचाराच्या पद्धतीवर भाष्य करताना कपिल पाटील यांनी प्रचारफलकांचा संदर्भ दिला. “अमरावती शहरात अनेक उमेदवारांचे बोर्ड पाहिले; मात्र त्यावर सावित्रीबाई फुले किंवा फातिमा शेख यांचे फोटो दिसले नाहीत. सुरेश देवकर सरांच्या बोर्डावर मात्र सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे फोटो अगदी वरती आणि मोठ्या स्वरूपात आहेत,” असे ते म्हणाले.

सुरेश देवकर निवडून आल्यानंतर ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही कपिल पाटील यांनी स्पष्ट केले.

‘आता परिवर्तन घडवायचे’

शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे यांनीही उपस्थित शिक्षकांना निवडणुकीसाठी सक्रिय होण्याचे आवाहन केले. “२३ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आजचा हा निर्धार कायम ठेवा. विधान परिषद शांत झाली आहे, कारण कपिल पाटील आज तिथे नाहीत. आता सुरेश देवकर यांच्या रूपाने आपला आवाज विधान परिषदेत पाठवायचा आहे,” असे बेलसरे म्हणाले.

प्रत्येकाने किमान तीन शिक्षकांना मतदानासाठी सोबत आणण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले. “यावेळी परिवर्तन घडवायचे आहे. अमरावती शिक्षक मतदारसंघ हा संघटनेचा मतदारसंघ आहे; तो कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. शिक्षकांचा विश्वासाला तडा जाऊ देणार नाही,” असेही बेलसरे यांनी सांगितले.

‘शिक्षकांचे प्रश्न शिक्षक संघटनाच समजू शकते’

उमेदवार सुरेश देवकर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवत आपली भूमिका मांडली. “शिक्षकांचे प्रश्न राजकीय पक्ष सोडवू शकत नाहीत. हे प्रश्न शिक्षक संघटनाच समजू शकते आणि सोडवू शकते. त्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी शिक्षक भारतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे,” असे त्यांनी सांगितले.

“आता गाफील राहून चालणार नाही. सावध आणि अलर्ट राहा. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहा. उर्वरित काळात प्रत्येकाने आपली जागा सोडू नये आणि आपल्या शाळेवर लक्ष ठेवावे,” असे आवाहन देवकर यांनी केले.

शिक्षक संघटना सहभागी होत असलेली ही शेवटची निवडणूक असेल, कारण निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याचा दावा त्यांनी केला. “तुम्ही या ऐतिहासिक कार्याचे भागीदार होणार आहात. शिक्षक वाचवायचे आहेत, शाळा वाचवायच्या आहेत. प्रत्येक मताचे मूल्य आहे. सर्वाधिक संख्येने मतदान करा,” असे आवाहन त्यांनी केले.

नामांकन मेळाव्यात शिक्षक भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिक्षक मतदारांनी उपस्थिती लावत संघटितपणे निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top